Sat, Jul 11, 2020 10:28होमपेज › Jalna › अन् शेतक-याने मुलांनाच औताला जुंपले! (video)

अन् शेतक-याने मुलांनाच औताला जुंपले! (video)

Last Updated: Jun 14 2020 10:13AM
अकोलादेव (जि. जालना) : पुढारी वृत्तसेवा

अकोलादेव येथे (जि. जालना, ता. जाफराबाद) बँकेने शेतकऱ्यांना अद्यापही पिक कर्जाचे वाटप न केल्याने पैशा अभावी शेतीची कामे रखडली आहेत. पिक कर्ज नसल्याने ट्रक्टर किंवा बैल ही कामाला घेता येत नसल्याने एका शेतकऱ्याला चक्क आपल्या मुलांना औताला जुंपावे लागले आहे. हे मन हेलावून टाकणारे दृष्य अकोलादेव येथील आहे.

कोरोनाच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांकडे पिक कर्जासाठी मागणी केली होती. पण अद्यापही पिक कर्जाचे वाटप न केल्याने तालुक्यातील अकोलादेव येथील शेतकरी संजय सांडु सवडे यांना आपल्या मुलांना औताला जुंपावे लागले आहे.  

जालना : आन्वा परिसरात अतिवृष्टी

संजय सांडु सवडे यांची तीन एकर जमीन असून यावरच त्यांचा उधारनिर्वाह अवलंबून आहे. शेती आहे पण पैसा नसल्याने शेती करण्यासाठी बैल जोडी नाही. त्यामुळे शेतीसह संसाराचा गाडा कसा हाकावा असा प्रश्न त्यांच्या पुढे होता. 

बैलजोडी घेण्याचे स्वप्न उराशी असूनही सतत पडणारा दुष्काळ, कधी अवकाळी पावसाचा तडाखा कधी गारपीट अशा या अस्मानी संकटांमुळे पिक गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. तर कर्जबाजारी झाल्यामुळे बैलजोडी विकत घेता आली नाही. त्यात आता कोरोनाची भरीस भर. या महामारीत बैलजोडीचे भाव ५० हजारा पासून ते १ लाखांच्या घरात गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सवडे यांनी धीर न सोडता बैल जोडी विकत घ्यावी म्हणून महाराष्ट्र बँकेकडे पिक कर्जासाठी वारंवार चकरा मारल्या, ऑनलाईन अर्ज दाखल केले मात्र बँकेकडून कोणाताच मेसेज आला नाही. शेवटी शेती करायचीच म्हणून नाईलाजास्तव स्वत:च्या एका मुलाला आणि त्याच्या एका मित्राला औताला जुंपावे लागले आहे. 
 

जालना : आईची दोन मुलांसह स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

हे करण्यामागे आपला कोणताच घेतू नसून माय बाप शासनाने आतातरी माझ्यासारख्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा आहे. 
- संजय सांडु सवडे, शेतकरी 

शेतकऱ्यांना त्यांच्या गावात ११०० पिक कर्जाच्या फॉर्मचे वाटप केले आहे. तर ऑनलाईन माध्यामातून १२०० अर्ज आले आहेत. पिक कर्ज हे फायनान्स स्केलच्या आधारावर शेतकऱ्यांना दिले जाते
- दिलु सिंग, व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक 

फक्त ७५ शेतकऱ्यांनाच पिक कर्जाच्या फॉर्मचे वाटप 

पण प्रकरणी सत्य स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न दैनिक पुढारीने केल्यानंतर प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे. अकोलादेव फक्त ७५ शेतकऱ्यांनाच पिक कर्जाच्या फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना बँकेने अद्यापही एकही खडकु दिला नसल्याचे शेतकरी बाबुराव सवडे, बद्री सवडे, यांनी सांगितले. तसेच जर बँका शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत असेल तर स्वत:हा जालना जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी चौकशी करून बँकांवर कारवाई करावी अशी मागणी अकोलादेव येथील शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.