Thu, Jul 09, 2020 03:42होमपेज › Jalna › घनसावंगी : लोकसभेतील मताधिक्यामुळे राष्ट्रवादीला धोक्याची घंटा

घनसावंगी : लोकसभेतील मताधिक्यामुळे राष्ट्रवादीला धोक्याची घंटा

Published On: Sep 22 2019 1:31AM | Last Updated: Sep 21 2019 7:40PM
अविनाश घोगरे

जालना जिल्ह्यात असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री राजेश टोपे व शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांच्यात थेट लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर घनसावंगी मतदार संघात सेनेचे उमेदवार संजय जाधव यांना 24 हजार 282 चे मताधिक्य मिळाले होते. घनसावंगी तालुक्यातील 8, अंबडमधील 4 आणि जालना तालुक्यातील 3 जिल्हा परिषद मंडळांचा या मतदार संघात समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत टोपे यांना सर्वच मंडळातून मताधिक्य मिळाले. मात्र, लोकसभा निवडणुकीत युतीला मताधिक्य मिळाल्याने टोपेंचे काय होणार, हा प्रश्नच आहे.

2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्याने या मतदार संघात चौरंगी लढत झाली. 2014 ला या मतदार संघातून भाजप दुसर्‍या क्रमांकावर, तर शिवसेनेचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर राहिला होता. पण, गेल्या पाच वर्षांपासून डॉ. उढाण जोरदार तयारी करत आहेत. 2014 चा पराभव पचवत पुढच्या काही दिवसांतच त्यांच्या मतदार संघातील दौर्‍याचे अनेकांना कुतूहल वाटले. समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी सूतगिरणी, समर्थ सहकारी बँक, मत्स्योदरी शिक्षण संस्थांमुळे टोपेंचा शेवटच्या स्तरापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आहे. घनसावंगीत सेनेला जास्त मते मिळावीत म्हणून उढाण यांनी केलेले प्रयत्न फायद्याचे ठरतील, असे म्हटले जाते. मतदार संघातील पायाभूत सुविधा आणि विकासाच्या प्रश्नावरून टोपेंच्या विरोधात मतप्रवाह बनवण्यात शिवसेनेला बर्‍यापैकी यश आले आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका परिणामकारक ठरणार आहे. तसेच ही निवडणूक स्थानिक नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असणार असल्याचे चित्र आहे.