Thu, Jul 09, 2020 04:39होमपेज › Jalna › टेंभुर्णीकरांना मिळणार मुबलक पाणी

टेंभुर्णीकरांना मिळणार मुबलक पाणी

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:27AMटेंभुर्णी : प्रतिनिधी

धरणात मुबलक जलसाठा असतानाही गावकर्‍यांपर्यंत पाणी पोहोचण्यात वीज वितरण कंपनीचे येणारी अडचण लक्षात घेता येथील ग्राम पंचायतीने एक लाख 65 हजार रुपयांचे जनरेटर खरेदी केले. त्यामुळे गावकर्‍यांना महिनाभराने येणारे पाणी दहाव्या दिवशी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावाला अकोला देव येथील जीवरेखा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मुबलक जलसाठा असतानाही विजेच्या भारनियमनामुळे टेंभुर्णीकरांना झोन पद्धतीने महिनाभरातून एकदाच पाणी मिळत् होते. उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई पाहता ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामनिधी मधून 1 लाख 65 हजार रुपयांचे जनरेटर खरेदी केले.

या जनरेटरच्या माध्यमातून अकोला देव धरणातून जलकुंभापर्यंत दररोज पाणीपुरवठा केला जातो. यामुळे टेंभुर्णीकराना दहाव्या, अकराव्या दिवशी पाणी मिळत आहे.यासंदर्भात ग्रामविकास विकास अधिकारी कैलास कल्याणकर यांनी सांगितले की, गावाला पाणी पुरवठ्याची कायम टंचाई असून वारंवार मागणी करूनही गावासाठी शासकीय टँकर उपलब्ध झाले नाही.यामुळे गावाची तहान भागविण्यासाठी सरपंच संगीता शिंदे यांनी नवीन जनरेटर खरेदी करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार पाणीपुरवठा करण्यासाठी जनरेटरची खरेदी करण्यात आली.

या जनरेटरची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून सदर जनरेटर पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीवर बसवण्यात आला. यासाठी दररोज ग्रामपंचायतीला 5000 रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. यामुळे गावकर्‍यांवर प्रत्येक महिन्याचे विशेष पाणी कर आकारण्याची तरतूद ग्रामपंचायतीने केली असून त्यानुसार गावात वसुली सुरू झाली आहे. महिनाभरात जवळपास दीड लाख रुपयांची वसुली या माध्यमातून होणार असून यातून डिझेलचा खर्च भागवीला जात असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.