Mon, Jul 06, 2020 15:19होमपेज › Jalna › कर्जमाफीनंतरही आत्महत्या सत्र सुरूच : धनंजय मुंडे

कर्जमाफीनंतरही आत्महत्या सत्र सुरूच : धनंजय मुंडे

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:21AMतळणी : प्रतिनिधी

कर्जमाफीनंतरही आत्महत्या सुरूच आहे. सरकारला शेतकर्‍यांचा कळवळा असता तर त्यांनी शेतकर्‍यांचा संपूर्ण सातबारा कोरा केला असता; परंतु ज्यांना शेतीतील काही कळत नाही, अशा लोकांच्या हाती सत्ता असल्याने शेतकरी हिताचे निर्णय होत नाहीत.

भाजप सरकारने केलेली फसवी कर्जमाफीची घोषणा, त्यांनतर बोंडअळींची न मिळालेली मदत व आता गारपिटीत शासनाने पाठ फिरवल्याने भाजप सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मंठा तालुक्यातील उस्वद देवठाणा येथे गारपीटग्रस्त भागाची पाहणी बुधवार (दि. 14) रोजी त्यांनी केली. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख अ‍ॅड. रायुकाँचे सरचिटणीस पंकज नाना बोराडे, राकाँच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संजय काळबांडे, बळीराम कडपे, भाऊसाहेब गोरे, कैलाश सरकटे, वसंतराव जाधव, भास्कर घारे,  अशोक सरोदे, माधव काकडे, सुभाष देशमुख, मोहन नाना, प्रवीण सरकटे, प्रभू चव्हाण आदींची उपस्थिती होती. 

मी शेतकर्‍यांचा मुलगा असल्याचे जाण
मुंडे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहे. मात्र  राज्यातील सरकारला याची जाणीव नाही. शेतकरी आज अडचणीत आहे. त्यांना मदतीची गरज आहे. यासाठी शेतकर्‍यांचा मुलगा व विरोधी पक्ष नेता म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. जगाचा पोशिंदा आज अडचणीत सापडला असून त्याच्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहे. कर्जमाफीसाठी वेगवेगळे निकष लावून व शेतकर्‍यांना रांगेत उभे करून या सरकारने शेतकर्‍यांची थट्टा केली असल्याचा आरोप त्यांनी केला.