Fri, Jul 03, 2020 19:08होमपेज › Jalna › विद्यार्थी हैराण, प्रमाणपत्रांसाठी कसरत

विद्यार्थी हैराण, प्रमाणपत्रांसाठी कसरत

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:17PMभोकरदन : प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयासह महा ई सेवा सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रे घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. मात्र, सातत्याने सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया होण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना रांगेत तासन्तास उभा राहण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एका प्रमाणपत्राची नोंदणी करण्यासाठी वीस मिनिटे ते अर्धा तासाचा कालावधी लागत आहे.
दहावी व बारावीचा निकाल नुकताच लागला असून पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमिलियर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत.

कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील कार्यालये, महा-ई-सेवा केंद्रामध्ये नोंदणी करावी लागते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प झालेली ऑनलाईन यंत्रणा अद्यापही सुरळीत झालेली नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा कालावधी रांगेत घालवावा लागत आहे. एका प्रमाणपत्रासाठी नोंदणी करताना वीस मिनिटे ते अर्धा तासाचा कालावधी जात आहे. सर्व माहिती अपलोड झाल्यानंतरच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. सकाळी रांगेत उभे राहिल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत यंत्रणा मंद असल्यामुळे नोंदणी होत नाही. महा ई सेवा सुविधा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अनेक वेळा जावे लागते परत

दुपारच्या दरम्यान रांगेमध्ये उभे राहिले तर सायंकाळपर्यंत नोंदणी करण्यासाठी थांबावे लागत नाही. यामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांना पुन्हा दुसर्‍या दिवशी लवकर येऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. पारदर्शकतेसाठी ऑनलाइन सुविधा केली असली तरी आता हिच सुविधा विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. सर्व्हर वाढविण्याची मागणी होत आहे.

एका सर्व्हरवर भार

सर्व प्रकारचे प्रमाणपत्र काढण्यासाठी राज्य स्तरावर एकच सर्व्हर उपलब्ध आहे. सर्वच जिल्ह्यांतील विद्यार्थी व पालक एकाच वेळी नोंदणी करत असल्यामुळे भार पडून नोंदणीच्या प्रक्रियेला विलंब लागत आहे. यामुळे महा ई सेवा सुविधा केंद्रातील कर्मचारीही हतबल झाले आहेत. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांनाही केवळ प्रतीक्षाच करावी लागते.

एक महिन्यांपासून अडचण

एक महिन्यापासून महा- ई- सेवा सुविधा केंद्रांमध्ये अशी अडचण निर्माण झाली आहे. तरीही शासनाच्या तांत्रिक विभागाकडून यासंदर्भात काहीच केले जात नाही. विद्यार्थी शेतकरी व अन्य नागरिकांची गरज ओळखून तांत्रिक अडचणी दूर करणे आवश्यक आहे.    मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. परिणामी सर्वत्र नाराजी वाढत आहे.