Tue, Jun 15, 2021 11:16होमपेज › Jalna › हरभरा खरेदी बंद

हरभरा खरेदी बंद

Published On: May 29 2018 1:40AM | Last Updated: May 28 2018 11:38PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सुरू असलेले हरभरा खरेदी मंगळवार (दि. 29) रोजी बंद होणार आहे. हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या 4 हजार 500 शेतकर्‍यांपैकी अवघ्या 1 हजार 55 शेतकर्‍यांचाच माल खरेदी करण्यात आल्याने जवळपास 3 हजार 145 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 

नाफेडतर्फे केल्या जाणार्‍या हरभरा खरेदीसाठी मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने  सोमवारी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनी जिल्ह्यातील चारही केंद्रांवर गर्दी केली  होती. सोमवार व मंगळवारी नोंदणी केलेल्या 3 हजार 145 शेतकर्‍यांचा माल खरेदी करण्याचे आव्हान नाफेडसमोर आहे. आजपर्यंत नाफेडच्या केंद्रावर 1 हजार 55 शेतकर्‍यांचा 12 हजार 335 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

परतूर व अंबड येथे तूर खरेदी संपल्याने तेथे हरभरा खरेदी सुरू होती. व्यापारी 3 हजार ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने हरभरा खरेदी करीत असतानाच नाफेडमधे 4 हजार 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी नाफेडकडे मोठी गर्दी करीत होते, मात्र विविध कारणांमुळे नाफेडचे केंद्र बंद-चालूच्या फेर्‍यात अडकल्याने शेतकर्‍यांना मनस्ताप सोसावा लागला. शेतकर्‍यांच्या हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसह विविध अटी घालण्यात आल्यानंतरही शेतकर्‍यांनी भाव चांगला मिळत असल्याने गर्दी केली, मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभरा पडलेला असतानाच मंगळवारी नाफेड खरेदी केंद्र बंद करीत आहे. खरेदी सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात नाफेडच्या वतीने 9 एप्रिलपासून हरभरा खरेदीस प्रारंभ करण्यात आला. प्रारंभापासून हरभरा खरेदीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तूर खरेदीमुळे वखार महामंडळाचे गोडाऊन फुल्ल झाले आहे. परिणामी हरभरा साठविण्यासाठी जागा शिल्लक नाही. तसेच बारदानाही संपला आहे. यामुळे नाफेडच्या वतीने 12 मेपासून हरभरा खरेदी आठ दिवस बंद करण्यात आली होती.