Thu, Jul 09, 2020 05:07होमपेज › Jalna › संपकरी कर्मचार्‍यांचे वेतनकपात

संपकरी कर्मचार्‍यांचे वेतनकपात

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 11:07PMजालना : अप्पासाहेब खर्डेकर 

वेतनवाढीच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे दहा दिवसांचे वेतन कापण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यांच्या वेतनातून संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

वेतनवाढीच्या मागणीसाठी एस. टी. महामंडळातील कर्मचार्‍यांनी 8 व 9 जून रोजी अचानकच संपाचे हत्यार उपसले होते. यामुळे ग्रामीण भागाची रक्‍तवाहिनी समजली जाणारी बसची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामध्ये राज्यातील सर्वच भागांतील कर्मचारी सहभागी झाले होते. काही ठिकाणी एक दिवस तर काही ठिकाणी दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला. आता या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास महामंडळाने सुरुवात केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कर्मचारी वर्ग औद्योगिक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांचे सर्व कार्यशाळा व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक व विभाग नियंत्रकांना पत्र निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 

8 व 9 जून अशा दोन दिवसांत संपामध्ये सहभागी राहून गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांचे ’ना काम, ना दाम’ या तत्त्वावर त्या दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार आहे. तसेच कारवाई म्हणून एक दिवस संपात सहभागी झालेल्या कामगारांचे आठ दिवसांचे तर दोन दिवस सहभागी झालेल्या कामगारांचे दहा दिवसांचे वेतन कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या आठ दिवसांच्या वेतनाची कपात जुलै तर उर्वरित दिवसांच्या वेतनाची कपात ऑगस्टपासून प्रत्येक महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी एक दिवस याप्रमाणे करण्यात येणार आहे.

कपातीची कुर्‍हाड, संतापाचे वातावरण

जिल्ह्यातील आंदोलनात सहभागी कर्मचार्‍यांची संख्या 8 जून रोजी 500 व 9 जून न रोजी 350 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या सर्वांवर वेतन कपातीची कुर्‍हाड कोसळणार आहे. यामुळे सध्या कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता वाढली असून त्यांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, एक व दोन दिवसांच्या संपात किती कर्मचारी सहभागी आहेत, याचे वर्गीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.