Mon, Jul 06, 2020 07:54होमपेज › Jalna › अंकुरित पिकांवर हरणांचा डल्ला : शेतकर्‍यांसमोर नवीन संकट

अंकुरित पिकांवर हरणांचा डल्ला : शेतकर्‍यांसमोर नवीन संकट

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 16 2018 12:24AMजालना : प्रतिनिधी

अल्पशा पावसावर पेरणी केल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला. यामुळे अंकुरित पिकांवर आता हरणांचे कळप हल्ला करत असल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात 1 लाख 68 हजार हेक्टरवर खरिपाचे पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद तूर, बाजरी, मका या पिकांच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात यंदा अल्पशा पावसावरच शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या. मध्यंतरी पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत होते.

चार दिवसांपूर्वी तालुक्यात सर्वदूर बर्‍यापैकी पाऊस झाला त्यामुळे उगवून आलेल्या पिकांना संजिवनी मिळाली तर जे बियाणे उगवलेच नव्हते तेही अंकुरण्यास सुरुवात झाली. पिके अंकुरात येताच हरणांचा उपद्रव वाढला आहे. जवळपास  जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये अंकुरित पिकांवर हरणांचे कळप हल्ला करून सर्व पीकच फस्त करत आहेत. जालना तालुक्यातील हातवण येथील सुभाष गायकवाड या शेतकर्‍याच्या शेतात पेरणी केलेले सोयाबीन अंकुरात येताच हरणांनी फस्त केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी पिकांची मशागत करत असतानाच हरणांचे कळप पिकांवर हल्ले करत असल्याने शेतकर्‍यांना आता पेरणीनंतरची शेती मशागतीची कामे करून शेतकर्‍यांना पिकांची राखणी करत बसण्याची वेळ आली आहे.

सकाळपासून रात्रीपर्यंतही शेतकर्‍यांना राखणीसाठी शेतातच थांबावे लागत आहे. तालुक्यातील सर्वच ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती असल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. वन विभागाने मात्र अद्याप या प्रकरणी लक्ष घातलेले नाही. बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पावसाने पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांच्या जीवातजीव आला असताना आता हरणांच्या उपद्रवाने डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाने हरणांचा उपद्रव कमी करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी शेतकर्‍यांनी वन विभागाकडे केली आहे.