जालना: सोनक पिंपळगाव येथे दोन गटांत कुऱ्हाडीने वार करत मारहाण, पैसे देण्या-घेण्यावरून वाद 

Last Updated: Jan 06 2021 5:54PM
अंबड (जालना) : पुढारी वृत्तसेवा 

अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे पैसे देण्याघेण्याच्या कारणावरुन वाद होत असताना भांडण सोडविण्यासाठी गेल्याने दोन गटांत तुंबळ मारहाण होण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत एकमेकांना कुऱ्हाडीने डोक्यात वार करून मारहाण केली आहे. फिर्यादी एकनाथ लक्ष्मण समीदर (वय ५२) तसेच परमेश्वर रावसाहेब रायकर (वय ३५, दोघांचाही व्यवसाय शेती, रा. सोनकपिंपळगाव ता. अंबड जि. जालना) या गटातील एकमेकांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अधिक वाचा : पुणे : महिलांच्या शौचालयात चित्रीकरण करणारा वेटर अटकेत; 'या' हॉटेलमध्ये करत होता चित्रीकरण!

याविषयी सविस्तर माहिती अशी की, कामाच्या मजुरीचे पैसे देण्याघेण्याच्या कारणावरुन वाद विकोपाला गेला. या दरम्यान लाठ्या- काठ्याने जबर मारहाण तसेच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी दि. ५ रोजी फिर्यादी एकनाथ लक्ष्मण समीदर यांनी परमेश्वर रावसाहेब रायकर, रावसाहेब विश्वनाथ रायकर, मुंजाभाउ बाबुराव रायकर, रामेश्वर विश्वनाथ रायकर आणि सुरेश मुंजाभाऊ रायकर (सर्व रा. सोनकपिंपळगाव ता. अंबड जि.जालना) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तर परमेश्वर रावसाहेब रायकर यांनी पंढरीनाथ लक्ष्मन समिंदर, ज्ञानेश्वर पंढरीनाथ समिंदर, एकनाथ लक्ष्मण समिंदर, गोपाळ एकनाथ समिंदर आणि गोविंद एकनाथ समिंदर यांच्या विरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा :गडचिरोली : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांकडून युवकाची हत्या

याप्रकरणी अंबड पोलिसात नमुद दोन्ही गटातील आरोपींविरोधात कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.