Thu, Jul 09, 2020 03:28होमपेज › Jalna › ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन 

ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन 

Published On: Nov 15 2018 1:20AM | Last Updated: Nov 15 2018 1:16AMजालना : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील बठाण बु. येथील पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचारासह चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी अंबड रस्त्यावील उड्डाणपुलावरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आंदोलन सुरू होऊनही जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आंदोलकांची भेट न घेतल्याने आंदोलक बराच वेळ टाकीवर ठाण मांडून होते.

अंबड तालुक्यातील बठाण बु.येथील पुरुष व महिला ग्रामस्थ व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील अंबड रोडवरील उड्डाण पुलाजवळील पालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढले. यामुळे पालिका कर्मचार्‍यांसह पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी टाकीवर चढलेल्या महिला व पुरुषांनी जोरदार घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनाकडे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याने टाकीवर बसलेल्या महिला व पुरुषांनी आंदोलन सुरुच ठेवले. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी 1 नेाव्हेंबर रोजी चौकशीसाठी एक समिती बठाण बु. गावात पाठवली होती. या समितीने केलेली चौकशी मान्य नसून 14 नोव्हेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदेालन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आरोपाच्या चौकशीसाठी आज बैठक 

बराच वेळ आंदोलन सुरु राहिल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी पाणीच्या टाकीपर्यंत जाऊन आंदोलकांना आंदोलन मागेे घेण्याचे आवाहन केले. मागण्यांच्या चौकशीसाठी गुरुवारी  बैठक बोलवीतो असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक पाण्याच्या टाकीखाली उतरले. या आंदोलनामुळे पेालिस प्रशासनातील कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर यशोदाबाई वखारे, कांताबाई सोमधाने, प्रदिप शिंदे, सिध्दार्थ सुतार, दिलीप सुतार, हरीभाऊ हरगे यांच्या सह इतरांची नावे आहेत.