Fri, Jul 03, 2020 18:05होमपेज › Jalna › करंगळी दाखविणारा अजित पवार होणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

करंगळी दाखविणारा अजित पवार होणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Published On: Feb 05 2018 2:03AM | Last Updated: Feb 05 2018 12:22PMघनसावंगी : प्रतिनिधी 

मी शेतकर्‍यांसाठी कासव होईन, पण शेतकर्‍यांनी पाणी मागितल्यावर त्यांना करंगळी दाखवणारा अजित पवार होणार नाही, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी घनसावंगी येथे लगावली. अजित पवार तुम्ही बिन शेपटी आणि बिन शिंगाचे प्राणी आहात, त्यामुळे शिवसेनेवर टीका करण्यापूर्वी विचार करा असा सल्‍ला त्यांनी दिला.

घनसावंगी येथे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन व शेतकरी मेळावा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे राज्य सचिव मिलिंद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, उपनेते लक्ष्मण वडले, विनोद घोसाळकर, सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, भास्कर अंबेकर, माजी आमदार शिवाजी चोथे, संतोष सांबरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांची उपस्थिती होती. 

घनसावंगी येथे हिकमत उढाण हे साखर कारखाना सुरू करणार आहेत. हे सर्व शेतकर्‍यांच्या हितासाठी आहे. आतापर्यंत अनेक कारखाने सुरू झाले व बंदही पडले. चालवणारे गब्बर झाले, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी सातत्याने शेतकरी रस्त्यावर उतरतो. शेतकर्‍यांना भावाबाबत आश्‍वासनांची गाजरे सरकार दाखवीत आहे. राष्ट्रवादी हल्लाबोल करत आहे. या सभामधून अजित पवार शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेला शेळी झाली, दुतोंडी गांडूळ, कासव आदी उपमा देत आहेत. अजित पवार हे  बिगर शिंगाचे आणि बिगर शेपटीचे आहेत. शिवसेना हा वाघ आहे. वाघ हा वाघच असतो, असे ते म्हणाले.सत्तेत राहूनही आम्ही शेतकर्‍यांच्या हितासाठी भांडतो. गेल्या वर्षी तूर उत्पादक शेतकर्‍याचे हाल झाले. या वर्षी ऊस उत्पादन चांगले आले. त्यामुळे साखरेला भाव मिळायला हवा. आपल्या देशात साखरेचे मोठे उत्पादन होत असतानाच मोदी सरकार पाकिस्तानातून साखर आयात करीत आहेत. एकीकडे पाकिस्तान देशावर हल्ले करत असतानाच मोदी सरकारला पाकिस्तानची साखर गोड कशी लागते, असा निर्लज्जपणा कशासाठी? तुम्ही अशा निर्लज्ज सरकारला पुन्हा निवडून देणार का? असा सवाल ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेती केंद्रित असून हे शिवसेनेच्या लढ्याचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेने भाजपला गेली 25 वर्षे सांभाळून घेतले. त्यांचे सर्व लाड, चोचले पुरवले, पण ते आता आमच्याच घरात घुसलेत. त्यामुळे आता आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. आता आम्ही एकटेच लढणार आणि एकटेच जिंकणार, असा ठाम विश्‍वास यावेळी व्यक्‍त केला. येणार्‍या निवडणुकीत हिकमत उढाण यांच्या पाठीशी उभे राहून शिवसेनेचे खासदार व आमदार निवडून आणावेत असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

खासदार संजय जाधव, अर्जुन खोतकर यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. हिकमत उढाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अपक्ष जि. प. सदस्य अन्सीराम कंटुले पं. स. अशोक उदावंत, संदीप कंटुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.