Mon, Jul 06, 2020 14:07होमपेज › Jalna › जालन्यात कोरड्या दुष्काळाची छाया

जालन्यात कोरड्या दुष्काळाची छाया

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:25AMभोकरदन  : प्रतिनिधी

तालुक्यात पेरणीयोग्य 1 लाख 3 हजार हेक्टरपैकी केवळ 69 हजार 507 हेक्टरवर पेरणी  झाली. 28 टक्के पेरणी झालेली नाही. तालुका सोमवारपर्यंत 1 लाख 3 हजार लागवड क्षेत्रांपैकी केवळ 69 हजार 507 हेक्टरवर लागवड व पेरणी झाल्याचे दिसत आहे. या पैकी 18 हजार 559 हेक्टर क्षेत्रावरील मका आणि 28 हजार 195 क्षेत्रावरील कपाशी लागवड पावसा अभावी वाया जाण्याची भीती व्यक्‍त केल्या जात आहे. पावसाच्या खंडामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांवर दुष्काळाचे सावट आहे.

भारतीय ऋतुमानानुसार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे अनुक्रमे चार-चार महिन्यांचा कालावधी असलेले ऋतू समजल्या जातात, पावसाच्या चार महिन्यांच्या कालावधीपैकी दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असताना 25 टक्के देखील पाऊस झाला नाही हे विशेष.  पावसाने अजूनही सरासरी ओलांडली नाही. सुरुवातीला मृग नक्षत्रातही पावसाने उशिरा हजेरी लावली होती. यामुळे जाणकार शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार 50 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटले आहे. मृग नक्षत्राच्या दुसर्‍या चरणामध्ये मूग आणि उडदाची पेरणी होणे अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार  केलेली पेरणीही वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही शेतकरी अल्प वाढ झालेली पिके काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत.

बोंडअळी कपाशींच्या फुलांमध्ये दिसू लागली आहे.पाकळ्या गळल्यानंतर बोंडाची निर्मिती होते. अळी ही पाकळ्यांमध्ये नव्हे तर बोंडाच्या सुरुवातीला असलेल्या टोकरावतच वास्तव्य करणारी असल्यामुळे त्या अळीसह बोंड तयार होत आहे. अळीयुक्त बोंड म्हणजे उत्पन्नाची हमी नाही.

यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने शेतीची पूर्वमशागत शेतकर्‍यांना करता आली नाही. परिणामी, कपाशी लागवडीसह इतर कामे उशिरा झालीत. दरम्यान, पावसाने हवामान विभागाच्या अंदाजानुसार तालुक्यात एकदाही हजेरी लावली नसल्याचे दिसत आहे. जूनमधील पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांनी जोमात पेरणी आणि लागवडीची कामे सुरू केली होती. 


अनेक भागांमध्ये लागवड व पेरणी झालेल्या शेतीला पाऊसच नसल्याने तडा गेल्या आहेत. यामुळे कपाशी आणि इतर पिकांचे रोप करपण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस समाधानकारक झाला नसल्याने तालुक्यातील जुई, पद्मावती धरणांसह बाणेगावमधील तलावांसह लहानमोठ्या तलावांतही जलसाठा अत्यल्प प्रमाणात आहे.

शेतकर्‍यांना कपाळावर हात देण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच उरले नाही. ही परिस्थिती लक्षात घेता तालुक्यात यावर्षी कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  तालुक्यातील वीरेगाव, तळणी, मनापूर, मलकापूर, वाकडी, आन्वा, पारध, वालसा वडाळा, बाभूळगाव, चोर्‍हाळा, धावडा, सेलूद परिसरातील पिके धोकादायक अवस्थेत आहेत.

आरक्षण मिळेपर्यंत 50 गावांचा मतदानावर बहिष्कार

भोकरदन तालुक्यातील राजूर येथे रास्ता रोको आंदोलनासह कडकडीत बंद पाळण्यात आला.  यावेळी 30 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण  न मिळाल्यास 50 गावांमधील सकल मराठा समाजाने यापुढील निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राजूर येथे रॅली काढून व्यापार्‍यांना बंदचे आवाहन  करण्यात आले. यावेळी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोणत्याही पक्षाला  मतदान करणार नसल्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.