Mon, Jul 06, 2020 09:04होमपेज › Jalna › मी अनाथांची माय, तुम्ही गणगोत व्हा

मी अनाथांची माय, तुम्ही गणगोत व्हा

Published On: Feb 05 2018 2:03AM | Last Updated: Feb 04 2018 11:12PMपरतूर : प्रतिनिधी 

जीवनाच्या खडतर प्रवासात मी अनाथांची माय झाले, तुम्ही त्यांचे गणगोत व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले. येथील ज्ञानलता पब्लिक स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा विमल जेथलिया, जि. प. चे माजी उपाध्यक्ष  राहुल लोणीकर, सभापती कपिल आकात, आसाराम चव्हाण, मनोहर खालापुरे, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. दीपाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिंधुताई  म्हणाल्या की, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे टोचले तरी चालायला शिका. आलेल्या संकटाला घाबरून न जाता त्याचा हिंमतीने सामना केला तर संकटाची उंची कमी होते आणि आपली वाढते. जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना केला. आज त्यावर विजय मिळवत आपण इथपर्यंत पोहचलो, असे सांगत त्यांनी आपल्या जीवनातील अनेक कटू प्रसंग आपल्या खास शैलीतून श्रोत्यांसमोर मांडले. आजच्या जमान्यात मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ आहे. मुलीची काळजी घ्या. मुलगी ही बापाची गरिबी झाकून नेते. मुलींना व महिलांना आज कणखर व्हावे लागणार आहे. संकट कोसळले तरी त्यावर मात करायला शिका. समाजात आज मानवता शिकण्याची गरज आहे, मानवता हीच काळजी गरज आहे .

सरकारच्या भरवशावर नव्हते

माझ्या संकटाच्या काळात गाय माझी माय झाली. तिच्याकडून मानवता मी शिकले आणि समाजाची माय होता आले. लेकराची माय मेली तर गाय मुलांना जगवते. त्यामुळे गायीला जपावे. थेंब थेंब दूध पाजून अनाथ मुले जगवले. मला सरकारने अनुदान दिले नाही  नाकारले. मात्र मी सरकारच्या भरवशावर बसले नाही. समाज माझ सरकार आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून लढा देत आहे. सिंधुताईंचे विचार ऐकण्यासाठी शहर व  परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.