Mon, Jul 06, 2020 09:12होमपेज › Jalna › कुस्तीची परंपरा जतन करा : बागडे

कुस्तीची परंपरा जतन करा : बागडे

Published On: Dec 21 2018 1:22AM | Last Updated: Dec 20 2018 11:41PM
जालना : प्रतिनिधी

अस्सल मातीचा खेळ असलेली कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. मात्र आजच्या युगात गावातील कुस्तीच्या आखाड्याची संख्या कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकांनी महाराष्ट्राची शान असलेल्या कुस्तीची परंपरा जतन करावी, असे प्रतिपादन  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या संयुक्त विद्यामाने 62 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी  बागडे बोलत होते. यावेळी सिने अभिनेते अरबाज खान, पालकमंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार राजेश टोपे, संदिपान भुमरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, शेषमहाराज गोंदीकर, भगवानबाबा आनंदगडकर, कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुस्तीचा सामना व क्रीडाज्योत मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले. बागडे म्हणाले, जालन्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील मल्लाना एकत्र आणून कुस्ती स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद आहे. पूर्वी गावात प्रवेश करताच आखाड्यात जोर, उटबश्या मारणारे पहेलवान समोर दिसत होते. आज परिस्थितीत बदल झाला आहे. गावात आखाडेच शिल्लक राहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा जतन करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खेळाडूंना प्रोत्साहान देण्यासाठी नियमित कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे. शासनाने कुस्ती स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास पोलिस उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.