Mon, Jul 06, 2020 14:08होमपेज › Jalna › परतूरमध्ये खा. संजय जाधव यांचे ‘धोंडे जेवण’

परतूरमध्ये खा. संजय जाधव यांचे ‘धोंडे जेवण’

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:05PMपरतूर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. धोंडे जेवण ठेवण्याच्या परंपरेत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी परतुरात या कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर अडचणींचा पाढाच वाचला.कार्यक्रमाला शिवसैनिकांसह, शेतकरी, लोकप्रतिनिधी, नेते मंडळी, व्यापारी, व प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आले होते. शिवसेनेचे नेते मोहन अग्रवाल, माधव कदम यांच्यासह तालुकाध्यक्ष बाबासाहेब तेलगड यांनी नियोजन केले होते. 

स्वबळावर

यावेळी खासदार जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आगामी निवडणूक पक्ष प्रमुख ज्यांना संधी देईल त्यांच्यासाठी काम करू. शिवसेनेची सध्यातरी स्वबळाची तयारी आहे. मात्र ऐनवेळी जो निर्णय असेल त्याप्रमाणेच आपला पक्ष काम करेल असे स्पष्ट केले. 

मावेजा मिळाला पाहिजे

खासदार जाधव यांनी तालुक्यातील केंद्राच्या योजनेतील कामांच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्र्यांनी जाणून बुजून टाळल्याचा आरोप केला. शेगाव दिंडी मार्गासाठी ज्या शेतकर्‍यांचा जमिनी गेल्या त्यांना मावेजा मिळालाच पाहिजे, असे जाधव म्हणाले.

परतूरमध्ये प्रथमच ‘धोंडे जेवण’

परतूर तालुक्यात प्रथमच लोकप्रतिनिधींनी धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. लोकसभा निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. 

पाणी आम्ही नाही पळवले

परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी परभणी जिल्ह्याला नाही तर नांदेड जिल्ह्यात गेल्याची माहिती त्यांनी दिली. परतूर तालुक्यातील हक्‍काच्या पाण्याचा साठा ठेवण्यासाठी विचार करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दुधना प्रकल्पाचे परभणीकरांना पाणी दिले नसल्याचा त्यांनी निर्वाळा दिला.

स्टेट बँकेतील दलालखोरीवर लगाम आवश्यक

परतूरमध्ये बँकांच्या विलीनीकरणानंतर एकच शाखा झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच अधिकारी व दलाल शेतकर्‍यांना वेठीस धरून कमिशनवर कर्ज देत असल्याचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर लगाम लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.