Fri, Jul 03, 2020 20:11होमपेज › Jalna › नूतनीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण

नूतनीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 30 2018 12:10AMजालना : प्रतिनिधी

वर्षभरापूर्वी बसस्थानकाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली, मात्र काम रखडल्याने परिसरात दगड, खड्डे खणल्याने त्याचे ढिगारे तसेच आहेत. नूतनीकरणाच्या नावाखाली मात्र सध्या विद्रुपीकरण झाले आहे. मुंंबई येथून या कामाची सर्व सूत्रे हलविली जात असल्याने काम सुरू होण्यात दिरंगाई होत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी मुंबई येथून येणारे आर्किटेक्ट न आल्याने रखडलेल्या कामाचा प्रश्‍न जैसे थे आहे. 

स्थानकातील फरशांची नूतनीकरणाच्या नावाखाली तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण बसस्थानकाची अवस्था बकाल झाली आहे. स्थानक परिसरात खडी व तुटलेल्या सामानाचे ढीग पडले आहे. 

गेल्या वर्षभरात या स्थानकात करावयाच्या नूतनीकरण कामाबाबत वेळोवेळी बदल करण्यात येत असल्याने काम सुरू करताना अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कामाची सूत्रे मुंबईतून हलविली जात असल्याने गेल्या वर्षभरात तोडफोडीनंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही. धूळ व मातीने बसस्थानकाला उकिरड्याचे स्वरूप आणले आहे. त्यातच बसस्थानकातील अंंतर्गत रस्त्याचे काम सुरू झाल्याने प्रवाशांना येणार्‍या अडचणीत भरच पडली आहे.

बसेस आत येणारे एक गेट बंद करण्यात आल्याने एकाच गेटमधून बसेस व प्रवाशांची वाहने बसस्थानकात येत आहेत. त्यामुळे बसस्थानकाचे गेट हे अपघाताचे द्वार बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तब्बल एक वर्षे होऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नसल्याने नूतनीकरणाचा मुद्दा सगळयांसाठी चर्चेचा बनला आहे. 

बसस्थानकात पडलेल्या खडी व मातीच्या ढिगामुळे एस.टी. चालकांना बस वळवताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात जालना स्थानक मॉडेल राहणार असे सांगणार्‍या एस.टी.च्या अधिकार्‍यांनी या स्थानकाचे प्रत्यक्ष  काम कधी सुरू होणार याबाबत माहिती देण्यास  असमर्थता दर्शविली. त्यामुळे मॉडेल होईल तेव्हा होईल, सध्या मात्र स्थानकाचा परिसर बकाल झाला आहे.