Fri, Jul 03, 2020 18:20होमपेज › Jalna › मराठा आरक्षण समितीवर निवेदनांचा पाऊस 

मराठा आरक्षण समितीवर निवेदनांचा पाऊस 

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:31AMजालना : प्रतिनिधी

मराठा आरक्षण जनसुनावणी समितीच्या सदस्यांवर मराठा समाजबांधवांनी निवेदनांचा पाऊस पाडला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. येथील अंबड रोडवरील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.9)  मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी निमित्त समितीचे अध्यक्ष न्या. एम.व्ही.गायकवाड, राजाभाऊ करपे, रोहिदास जाधव, सर्जेराव निमसे या चार सदस्यांच्या समितीने निवेदन स्वीकारले.

यावेळी समिती सदस्यांची भेट घेऊन त्यांना माजी आमदार अरविंद चव्हाण, आर.आर. खडके, मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, युवा सेनेचे जगन्‍नाथ काकडे, सुहास मुंढे, गुलाब पाटील  यांच्यासह इतरांनी निवेदन दिले. यावेळी अरविंद चव्हाण यांनी 1928 मधे प्रकाशित झालेले जातवार क्षत्रियांचा इतिहास हे के.बी. देशमुख लिखित मराठा व कुणबी एक असल्याचे पुरावा दर्शवणारे 350 पानांचे पुस्तक समितीला सादर केले. समितीच्या सदस्यांनी यापूर्वी परभणी, बीड, नांदेड व हिंगोली येथे दौरे केले. त्यात सर्वाधिक निवेदन नांदेड येथे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड येथे  अंदाजे 1 लाख,परभणी 40 हजार, बीड 35 हजार, हिंगोली 35 हजार निवेदने प्राप्‍त झाल्याची माहिती मिळाली. 16 मार्च रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या विभागीय जनसुनावणी परिषदेत हे अर्ज ठेवण्यात येणार आहे.

समितीच्या सदस्यांना अर्ज देण्यासाठी अंबड रोडवरील विश्रामगृहात मराठा समाजबांधवांसह इतर समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 
प्रत्येक निवेदनाची नोंद घेण्यात येत होती. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी समितीच्या सदस्यांकडे केली. अनेक शिष्टमंडळांनी एकत्र येत एकच निवेदन दिल्यामुळे निवेदनाची संख्या सकाळी कागदावर जरी कमी भासत असली तरी प्रत्यक्षात मोठी होती. सायंकाळी उशिरापर्यंत निवेदन देण्यासाठी विश्रामगृहावर मोठी गर्दी  झाली होती. येणार्‍या प्रत्येकाचे अर्ज  समितीचे सदस्य उभे राहून स्वीकारत होते. त्यानंतर या निवेदनाची नोंद एका रजिस्टरमधे निवेदन देणार्‍यांच्या नावासह करण्यात येत होती.