Sun, Jul 12, 2020 21:57होमपेज › Jalna › गोळीबार प्रकरणात परतूरचा व्यापारी जेरबंद 

गोळीबार प्रकरणात परतूरचा व्यापारी जेरबंद 

Last Updated: Nov 22 2019 1:50AM
जालना : प्रतिनिधी  

येथील व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकार्‍यांनी चौघांना जेरबंद  केले. आरोपींनी सदर गोळीबार परतूर येथील  व्यापारी राजेश माणकचंद नहार याच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले आहे.

शहरातील सिंदखेडराजा रोडवरील वनविभागाच्या जॉगिंग ट्रॅकवर 31 आक्टोबर रोजी पत्नीसह मॉर्निंग वॉकला गेलेले व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर सकाळी सहाच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवर येऊन गावठी पिस्टलने गोळीबार केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी भेट दिली होती. त्यानंतर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्यापार्‍यावरील हा गोळीबार सोमीनाथ उर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड (रा.करोडी,जि.औरंगाबाद, ह.मु शिवनगर जालना) याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गौर यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सोमीनाथला ताब्यात घेतले. तपासात त्याने दत्ता बाबासाहेब जाधव (रा.आंबा, ता.परतूर) व जालिंदर सर्जेराव सोलाट (रा.मांडवा, ता.बदनापूर) यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले. त्यावरून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप, मारुती स्विफ्ट डिझायर कार, एक गावठी पिस्टल, मोबाईल असा 8 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला. सदर गुन्हा परतूर येथील कापसाचे व्यापारी राजेश मानकचंद नहार यांच्या सांगण्यावरुन केल्याचे पकडलेल्या आरोपींनी तपासात सांगितले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, जमादार सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, हिरामन फलटणकर, रणजीत वैराळ, कृष्णा तंगे यांनी केली.