Mon, Jul 06, 2020 06:44होमपेज › Jalna › फोडाफोडीसोबतच आरोप-प्रत्यारोपांची धुळवड

फोडाफोडीसोबतच आरोप-प्रत्यारोपांची धुळवड

Published On: Mar 11 2018 1:29AM | Last Updated: Mar 11 2018 1:19AM- अविनाश घोगरे

आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून तालुक्यातील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राजकीय सभा आणि कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीबरोबरच बोगस मतदारांचा शोध घेऊन नव्याने मतदार नोंदणीच्या कामालादेखील गती देण्यात येत आहे. एकीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये एकत्रित होणार असल्याच्या चर्चा आणि दुसरीकडे घनसावंगीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण धुमसू लागले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह  इतर पक्षांकडून बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादीने ओबीसी मेळावा घेतला.  तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी महागाईच्या मुद्यांवर काढलेला हल्लाबोल मोर्चा   शिवसेनेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित डॉ हिकमत उढाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व शेतकरी मेळावा. यामुळे विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या कार्यक्रमातून सुरू झालेली राजकीय धुळवड व शिमगा यामुळे मतदारसंघातील गावागावांत निवडणूक सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. 

मतदारसंघात राष्ट्रवादीकडे  दोन साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बँक, आदींच्या माध्यमातून हक्काचे मतदार असल्याने आमदार राजेश टोपे यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. तर याच मतदारसंघात शिवसेनेनेदेखील शेतकर्‍यांसाठी साखर कारखाना उभा करण्याची घोषणा केल्याने डॉ. हिकमत उढाण यांना या माध्यमातून हक्काचे मतदार मिळणार आहेत. 

टोपे 97 हजार मते घेऊन  झाले होते विजयी

2014 मध्ये राजेश टोपे 97 हजार 864 मते घेऊन निवडून आले होते. शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. महाराष्ट्रासह मोदी लाटेतही घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादीचा गढ ढासळला नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने आधीच केली आहे. त्यामुळे टोपे यांच्याविरुद्ध दंड थोपटणार्‍यांची शिवसेनेकडे गर्दी झाली आहे. त्या वेळी भाजपकडून निवडणूक लढवलेले विलास खरात 54 हजार 471 एवढी मते घेऊन दुसर्‍या  स्थानावर होते. तर  शिवसेनेचे डॉ. उढाण 45 हजार 610 एवढी मते घेऊन तिसर्‍या स्थानावर  होते. 

आर्दड, लाखेंना बसला होता पराभवाचा हादरा

निवडणुकीत मनसेचे सुनील आर्दड व काँग्रेसचे संजय लाखे यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही शिवसेना राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसाठी राजकीय भवितव्य ठरवणारी आहे. कोणाच्या कार्यक्रमाला कुणी जायचे, हे ठरविणारे नेते आता गावोगावी लग्नापासून अंत्यविधीपयर्र्ंत सवर्र्ंच कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत.