Sat, Nov 28, 2020 19:04होमपेज › Jalna › कुटुंब चालवणे अवघड !

कुटुंब चालवणे अवघड !

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:09AMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका दररोज उडत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक होरपळले जात आहेत. सर्वाधिक फटका ऑटोरिक्षा, मालवाहू वाहनांना बसत आहे. ऑटोरिक्षांची दरवाढ झाली नसली तरी भविष्यात ती अटळ आहे. पेट्रोल दरवाढीमुळे ऑटोरिक्षाचालकांसमोर संकट उभे राहिले आहे. 

सध्या पेट्रोल 85 तर डिझेल 73 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. यामध्ये दररोज दरवाढ होत असली तरी प्रवासी भाडे वाढले नसल्याने हा व्यवसाय अडचणीमध्ये सापडला आहे.  कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड बनले आहे. 

आर्थिक नियोजन ढासळले

कुटुंबासाठी शहरात 10 वर्षांपासून रिक्षा चालवितो. सद्य:परिस्थितीत पट्रोलचे दर वाढल्याने आर्थिक नियोजन ढासळलेले आहे. बसस्थानकापासून शिवाजी पुतळा, रेल्वेस्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणांवर रिक्षा चालवतो. सीटरचा दर 10 ते 15 रुपये प्रतिप्रवासी आहे. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत दिवसाकाठी 700 ते 800 रुपयांचा व्यवसाय होतो. पेट्रोल, ऑइल व इतर कारणांसाठी 400 रुपये खर्च होतात. दररोज बारा तास काम करून 300 रुपये उरतात. मुलगा सेमीइंग्रजी शाळेत असून त्याचा खर्च, घरखर्च, दवाखाना आदींसाठी मोठा खर्च होतो. इंधन दरवाढीमुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवणे मुश्कील झाले आहे. 

 - भास्कर सूर्यवंशी, रिक्षाचालक

डिझेल खर्च वाढल्याने त्रस्त

डिझेलचे भाव दररोज वाढत आहे. दरवाढीमुळे आमच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. इंधन आणि बचत याची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहे. माझा पाणी जारचा व्यवसाय. जार वाटप करण्यासाठी दिवसाकाठी 500 रुपये खर्च होत आहेत. उर्वरित पैशांमधून घर चालविणे शक्य होत नाही. त्यातही इतर वस्तूंचे दर वाढले, आमचे दर मात्र अजूनही जैसे थे आहे.     
- दुर्गेश शिंदे, मालवाहतूक, चालक