वडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्तसेवा
जालना-बीड मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना आज (दि. ४) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जालना-बीड मार्गावरील अंतरवाला फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रक आणि चालक दोघेही पसार झाले. सौरभ भगवान जोगदंड (वय २१, रा. गोलपांगरी, ता. जालना) असे मृतांचे नाव आहे.
दुचाकीस्वार सौरभ हा आज बीकॉम तृतीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी बदनापूर येथील पाथरीकर महाविद्यालयात निघाला होता. जालना-बीड मार्गावर जालन्याकडे जाणाऱ्या त्याच्या दुचाकीला क्रमांक एमएच २१ बीके ६२८५) मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच ४६ एआर ४५७९) जोराची धडक दिली. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने साौरभ जागीच ठार झाला.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि जालना पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सौरभचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या अपघातानंतर नागरिक आणि वाहनधारकांनी घटनास्थळी गर्दी झाली होती. जालना- बीड हा मार्ग नवीन असल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. यामुळे वेगावर नियंत्रण नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहे.