Thu, Jul 09, 2020 04:58होमपेज › Jalna › आता पीक विम्याचा अर्ज मिळणार ऑनलाइन

आता पीक विम्याचा अर्ज मिळणार ऑनलाइन

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 1:02AMभोकरदन : प्रतिनिधी

शासनाने सर्व कामे ऑनलाइन केली. लिंक राहात नसल्याने प्रत्येक कामाचा बट्ट्याबोळ होत असताना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्जदेखील ऑनलाइन भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याकरिता हातची कामे सोडून शहराच्या ठिकाणी जाण्याची वेळ पुन्हा एकदा शेतकर्‍यांवर आली आहे. ऑनलाइन अर्ज 20 रुपयांना देण्यात येत असून वेगळे पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. शासनाने शेती व शेतीसंदर्भातील योजनाकरिता ऑनलाइन प्रक्रिया पुढे केली. ही प्रक्रिया सर्वसामान्यांना कळत नाही. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता प्रत्येक वेळी दुसर्‍याची मदत घ्यावी लागते. त्या मदतीकरिता वेळप्रसंगी पैसेही मोजावे लागतात. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून देणार्‍या व्यक्‍तीने योग्य पद्धतीने माहिती भरली तर लाभ मिळतो. चूक केली तर लाभापासून वंचित व्हावे लागते.त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरावा लागतो.

याचा प्रत्यय अनेक शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषीकर्ज सन्मान योजनेत आला. आधीच पीक विम्याची रक्‍कम अनेकांना मिळालेली नाही. त्यामुळे पीक विम्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. 

अशातच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेऊ पाहणार्‍यांकरिता ऑनलाइन प्रक्रिया मनस्तपाचे कारण आहे. विमा काढण्याकरिता भरावा लागणारा अर्ज हा सेतू किंवा खासगी संगणक केंद्रामधून भरावयाचा आहे. त्यासोबत आधारकार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, लावलेल्या पिकाचे क्षेत्र आदी अर्जात नमूद करायचे आहे.

ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर शेतकर्‍याला विम्याची रक्‍कम सांगण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍याला पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करताना द्यावे लागेल. त्याचा नमुना सेतू केंद्रात उपलब्ध झाल्याची महिती देण्यात आल्याचे तहसील कार्यालयातल सूत्रांनी सांगितले.