Fri, Jul 03, 2020 19:10होमपेज › Jalna › दूध व्यवसाय अडचणीत 

दूध व्यवसाय अडचणीत 

Published On: Jun 01 2018 1:59AM | Last Updated: May 31 2018 11:28PMजालना : प्रतिनिधी

दिवसेंदिवस घसरत चाललेल्या दुधाच्या दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्र नसले तरी काही संकलन केंद्रावर मोठ्या प्रमाणात दूध संकलन होते. जिल्ह्यात दिवसाकाठी 8 ते 10 हजार लिटर दूध संकलित होते.

कडक उन्हामुळे पाणीटंचाई आहे. अनेक शेतकरी शेतात पिके न घेता दुधाळ जनावरांसाठी चार्‍याची लागवड करून त्यांचा सांभाळ करतात. काही महिन्यांपासून दूध 20 ते 25 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. त्यामुळे जनावरांना लागणारी वैरण, ढेप, दवाखाना, औषधी आदी खर्च दूध विक्रीतून मिळणार्‍या पैशांतून होत नाही. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात आहे. हे दूध 30 ते 35 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले तर दूध उत्पादकांना फायदा होऊ शकतो. 

खवा दोनशे रुपये किलो 

दुधाचे भाव कमी झाले असले तरी दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाच्या किमती वाढत आहेत. खवा दोनशे रूपये किलो विक्री होत आहे. श्रीखंड, दही, ताक, पनीर,  बर्फी यांच्या किमती दूधापेक्षा अधिक आहेत.

माझ्याकडे तीन गायी आहेत. त्यांना दररोज सहाशे ते सतशे रुपयांचा चारा लागतो. परंतु, दुधाचे भाव घसरल्याने हा चारा विकत घेण्यासाठीच पैसे उरत नाही. त्यामुळे सरकारने दुधाचे भाव तातडीने वाढवावेत.  - दादाराव गायके,दूध उत्पादक शेतकरी

गायींच्या किंमती घसरल्याने नुकसान

मी दररोज 25 ते 30 लिटर दूध विकतो. मला हे दूध मोटारसायकलवरून घेऊन जावे लागते. दुधाचे भाव चांगले होते. तेव्हा मला काही अडचण नव्हती. पण दुधाचे भाव घसल्याने मी आर्थिक संकटात सापडलो आहे.- भास्करराव मदन, दूध उत्पादक शेतकरी