Wed, Feb 19, 2020 00:41



होमपेज › Jalna › महिकोच्या भोजन योजनेचे लोकार्पण

महिकोच्या भोजन योजनेचे लोकार्पण

Last Updated: Feb 06 2020 1:49AM




जालना : पुढारी वृत्तसेवा
गुणवत्तापूर्ण शिक्षण व पौष्टिक आहाराच्या माध्यमातून संस्कारक्षम व बलवान पिढी घडते. समाजभावनेतून बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाचा विस्तार संपूर्ण देशभरात अधिक प्रमाणात वाढावा, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र हायब्रीड सीडस कंपनी लि. (महिको) व अन्न अमृत फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

गोल्डन  ज्युबली स्कूल परिसरात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, अन्नामृत फाउंडेशनचे राधाकृष्ण दास, महिको मॉन्सेन्टो कंपनीचे आशिया खंड विभागाचे प्रमुख सिमोन थोरस्टेड विबुस्च, आमदार हरिभाऊ बागडे, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, नगरध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोश्यारी म्हणाले, समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजण केवळ स्वत:साठी जगत असतो, परंतु सर्वश्रेष्ठ तोच व्यक्‍ती आहे जो दुसर्‍यांसाठी जगतो.  समाजाप्रति आपलेही काही देणे लागते या भावनेतून जगणे म्हणजे श्रेष्ठ असल्याचे सांगत अन्नामृत फाउंडेशनचे राधाकृष्ण दास व महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले समाजातील एकही बालक भुकेले राहू नये या दृष्टीने  माध्यान्ह भोजन योजनेतून बालकांना स्वादिष्ट व पौष्टिक आहार उपलब्ध करून देत असून त्यांच्या कार्याचा समाजातील प्रत्येकाने आदर्श घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले म्हणाले, बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहार आवश्यक आहे.  अन्नामृतच्या माध्यमातून देशभरातील 13 लाख बालकांना तर जिल्ह्यातील 50 हजार बालकांना अन्न उपलब्ध करून देण्यात येत आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यातील एक लाख बालकांना अन्न उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे सांगत डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी पाहिलेले स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले.  प्रास्ताविकात राधाकृष्ण दास यांनी अन्नामृत फाउंडेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली.