Thu, Jul 09, 2020 03:04होमपेज › Jalna › मराठा आरक्षण : पहिल्याच दिवशी 251 जणांचे मुंडण

मराठा आरक्षण : पहिल्याच दिवशी 251 जणांचे मुंडण

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMजालना : प्रतिनिधी

मराठा समाज शेतीवरच अवलंबून आहे, शेतीमालास भाव नाही, शेतीची झालेली दयनीय अवस्था, यामुळे बँकांकडे शेतजमिनी गहाण पडलेल्या आहेत. ग्रामीण भागात स्मशानभूमी झाल्या, खेड्यात माणसे नव्हे तर मडी राहतात, पतच नसल्याने शेतकर्‍यांच्या  आत्महत्यांचे सत्र व्यवस्थेने गांभीर्याने घेतले नाही म्हणून शेतीवर अवलंबून असलेला मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. सर्वच पक्षांत असलेल्या वाघांनी (मराठा नेत्यांनी) डरकाळी फोडल्यास भावी पिढ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल, असा विश्‍वास नाटककार राजकुमार तांगडे यांनी येथे व्यक्त केला.

संभाजी उद्यान परिसरातील संभाजी राजे पुतळ्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात रविवारी (दि. 5) सामूहिक मुंडण आंदोलनास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी युवकांसह समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे यांच्यासह 251 जणांनी आरक्षणाची घोषणा करण्यास टाळाटाळ करणार्‍या  शासनाचा निषेध नोंदविला. आरक्षण आमच्या हक्काच... नाही कुणाच्या बापाच... एक मराठा... लाख मराठा... अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आगामी दोन दिवस (दि. 8  पर्यंत) मुंडण आंदोलन सुरूच राहणार आहे.