Fri, Jul 03, 2020 19:27होमपेज › Jalna › रास्ता रोको, बसेसवर दगडफेक

रास्ता रोको, बसेसवर दगडफेक

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 25 2018 11:53PMजालना : प्रतिनिधी

 पाच दिवसांपासून सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चा आंदोलन गुरुवारीही सुरूच होते. अंंबड तालुक्यातील वडीगोद्री, गोंदी, शहागड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. जालना व भोकरदन येथे धरणे आंदोलन तर जाफराबाद येथे शासकीय कार्यालयांचे काम बंद पाडण्यात आले. मंठ्यात पाचव्या दिवशी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात शाळकरी विद्याथ्यार्र्ंनी गणवेशात सहभाग घेतला.

भोकरदनमध्ये तरुणांचे मुंडण
भोकरदन : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाचा निषेध म्हणून तरुणांनी मुंडण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे व बंदोबस्तासाठी आलेल्या व निधन झालेल्या पोलिस कर्मचारी श्याम  काटगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

शासनाचा निषेध म्हणून सुरेश तळेकर, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सुखदेव शिरसाट, कैलास पुंगळे, विष्णू भालेराव, नवनाथ दौड, किशोर गाडेकर, साळुबा लोखंडे, कृष्णा आगळे, भगवान पालकर, बळीराम इच्चे, केशव जंजाळ व गजानन नागवे या 13 तरुणांनी मुंडण केले. उपविभागीय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी यांनी धरणे आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहागडजवळ तीन बसेसवर दगडफेक
वडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील शहागड बसस्थानकाजवळील उड्डाण पुलाजवळ तीन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने बसच्या काचा फुटल्या. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अज्ञात चार ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद सोलापूर महामार्गावरून बस क्रमांक एम. एच. 20 बी. एल. 3836 औरंगाबाद-उदगीर, एम. एच. 14 बी. टी. 2519 औरंगाबाद-लातूर, एम. एच. 14 बी. टी. 3427 औरंगाबाद-सोलापूर या तीन बसेसवर आंदोलकांनी दगडफेक केली. त्यात बसच्या समोरील व बाजूच्या काचा फुटल्याने  अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.  घटना घडताच बसचालक गुंडाप्पा शिवाप्पा कुंभार, आनंद महादेव शिंदे व शेख अहमद शेख करीम यांनी शहागड बसस्थानकात बसेस उभ्या करून गोंदी पोलिस ठाण्यात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सय्यद नसीर करत आहे.