Mon, Jul 06, 2020 15:49होमपेज › Jalna › पुण्याच्या निखिल कदमची बाजी

पुण्याच्या निखिल कदमची बाजी

Published On: Dec 22 2018 1:38AM | Last Updated: Dec 22 2018 1:38AM
जालना : प्रतिनिधी

61 किलो माती गटाच्या उपांत्य लढतीत पुण्याच्या निखिल कदमने सातार्‍याच्या सागर सूळचा 7 विरुद्ध 0 असा पराभव केला. तसेच 70 किलो माती गटात कोल्हापूरचा स्वप्निल पाटीलने बाजी मारली.

आझाद मैदानावर सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 14 मल्लांनी दुसर्‍या फेरीत मजल मारत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात माती व गादी प्रकारांत कुस्त्यांचे सामने घेण्यात आले. अनेक मल्‍लांनी अटीतटीची लढत दिली. 

दुसर्‍या फेरीत प्रवेश करणार्‍यांमध्ये 70 किलो माती गटात दिनेश मोकाशी व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतीकुमार पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यात दिनेश मोकाशी पाच विरुद्ध चार गुणांनी विजयी झाला. दुसरी लढत कोल्हापूरच्या स्वप्निल पाटील व रत्नागिरीचा अविनाश लोखंडे यांच्यात झाली. यात एकतर्फी लढतीत स्वप्निल पाटीलने 10 विरुद्ध 0 गुणांनी लोखंडेवर विजय मिळविला. सोलापूरच्या धीरज वाकमोडे व अहमदनगर तुषार जगताप यांच्यात झालेल्या लढतीत धीरजने तुषारचा 10 विरुद्ध 7 गुणांनी पराभव केला. या गटांतून उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या स्वप्निल पाटीलने पुण्याच्या दिनेश मोकाशीवर 4 विरुद्ध 3, तर  शुभम थोरात याने सोलापूरच्या धीरज वाकमोडेवर 8 विरुद्ध दोन गुणांनी पराभव केला. स्वप्निल पाटील व शुभम थोरात यांच्यात शनिवारी अंतिम लढत होणार आहे.

61 किलो माती गटाच्या उप उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या निखिल कदम याने सातार्‍याचा आबासाहेब अतकुळे याचा 4 विरुद्ध दोन गुणांनी पराभव केला. सातार्‍याच्या सागर सूळ व धुळ्याच्या समीरखान पठाण या लढतीत सागर सूळने पठाणला चितपट केले. सांगलीचा राहुल पाटील व औरंगाबादचा अजमेर शहा यांच्यात झालेल्या लढतीत पाटीलने शहाचा 12 विरुद्ध 2 गुणांनी पराभव केला.राहुल पाटील व दत्ता मेटे यांच्यात झालेल्या लढतीत राहुलने दत्ताचा 12 विरुद्ध 11 अशा चुरशीच्या सामन्यात त्यास पराभूत केले. सागर सूळ व दत्ता मेटे यांच्यात तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सागरने दत्तावर 5 विरुद्ध 4 गुणांनी मात केली. यावेळी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,आदींची उपस्थिती होती.