Thu, Jul 09, 2020 03:30होमपेज › Jalna › शिवसेना राज्यमंत्र्यांची पत घसरली

शिवसेना राज्यमंत्र्यांची पत घसरली

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 11:04PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रमुख नेता शहरात नसताना शिवसेनेचा विभागीय मेळावा घेतला जातो याचा अर्थ शिवसेनेत मंत्र्यांना किंमत राहिली नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केले. तसेच साखर कारखाना व जिनिंग यांच्या जमिनी हडपल्या हे खरे जालन्याचे लालूप्रसाद  आहेत, अशी टीकाही दानवे यांनी खोतकर यांच्यावर केली.
शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन   व   जामवाडी येथील ईद मिलन कार्यक्रमात खासदार दानवे बोलत होते. यावेळी  जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर, भाऊसाहेब वाढेकर, एकबाल  पाशा, अब्दुल रशीद पहेलवान, प्रशांत वाढेकर, देविदास देशमुख,  आयेश खाना, अब्दुल हाफिज, सय्यद सलीम,  शशिकांत घुगे, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार दानवे यांनी प्रारंभी  गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली व विरोधकांचा समाचार घेतला.

आजपर्यंत काँग्रेसी विचारधारेने मुस्लिम समाजाला भाजपविरोधी मत बनविण्याचे काम केले, परंतु आता राजकीय समीकरणेे बदलत आहे, असे सांगत सरकार कुठलेही असो अल्पसंख्याकांचा निधी खर्च करावो लागतो. भोकरदन, फुलंब्री आणि मुस्लिमबहुल गावांत ईदगहा, शादीखाण्यासाठी निधी दिलेला आहे. मुस्लिम समाज बांधवांनी मनातील कटुता व विवाद विसरून भाजपकडे येण्याचे आवाहन खा. दानवे यांनी यावेळी केले.

55 कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्यांची कामे सुरू

शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन खा. दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की, शहरात ज्यांची सत्ता होती त्यांनी शहराच्या विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही. भाजपची सत्ता आल्यावर शहरात 55 कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असून काही कामे मंजूर करावयाची आहेत. शहरात पाणी कमी व वीजबिल अधिक यायचे. जुनी नळ योजना नादुरुस्त होती त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून या योजनेच्या दुरुस्तीसाठी 150 कोटी रुपये मंजूर केले व त्याचे काम आता प्रगतिपथावर आहे. जालना- वडीगोद्री रस्त्यासाठी चारशे कोटी रुपये मंजूर केले. आयसीटी कॉलेज मंजूर झाले असून त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शिवाय शहराच्या वैभवात भर घालणारा महत्त्वाकांक्षी सिडको प्रकल्प मंजूर केला आहे. तर ड्रायपोर्टचे काम सुरू असून जालना लोकसभा मतदारसंघात सहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दानवेंनी सांगितले.