Fri, Nov 27, 2020 22:21होमपेज › Jalna › सत्ताधारी पक्षांकडून राज्यात जातीपातीचे राजकारण

सत्ताधारी पक्षांकडून राज्यात जातीपातीचे राजकारण

Last Updated: Nov 23 2020 1:46AM
जालना : पुढारी वृत्तसेवा

सत्ताधारी राजकीय पक्षांकडून जातीपातीचे राजकारण करण्यात येत असून, या माध्यमातून त्यांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने मात्र नेहमी विकास हीच दूरदृष्टी ठेवून वाटचाल केली आहे. त्यामुळे जातीपातीचे राजकारण करणार्‍यांना निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जालना येथे रविवारी केले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ जालना दौर्‍यावर असताना प्रवीण दरेकर बोलत होते. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार बबनराव लोणीकर, शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले की,  राज्यामध्ये गेल्या 40 वर्षात विविध समाजाचे मुख्यमंत्री झाले. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. उच्च न्यायालयात टीकेल असे आरक्षण त्यांनी मराठा समाजाला दिले. मात्र ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजाला सोबत न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या वर्षभरापासून ठाकरे सरकार केवळ जातीपातीचे राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.