Fri, Jul 03, 2020 19:02होमपेज › Jalna › दानवे यांच्यापुढे खोतकरांचे आव्हान

दानवे यांच्यापुढे खोतकरांचे आव्हान

Published On: Feb 18 2019 11:51PM | Last Updated: Feb 18 2019 10:38PM
जालना लोकसभा मतदारसंघातून चार वेळेस निवडून गेलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. त्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मागे विरोधकांनी बळ उभे केले असल्याचे चित्र आहे.

जालना लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून गेल्या तीस वर्षांपासून ओळखला जातो. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून जनता पक्षातर्फे पुंडलिक हरी दानवे विजयी झाले होते. त्यानंतर 1980 आणि 1984 मध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब पवार यांनी जालन्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. 1989 मध्ये मतदारांनी पुन्हा भाजपच्या पुंडलिक दानवे यांना संधी दिली. 1991 मध्ये मात्र काँग्रेसचे अंकुशराव टोपे खासदार झाले. उत्तमसिंग पवार हे 1996 आणि 1998 मध्ये भाजपच्या तिकिटावर सलग दोनदा खासदार झाले. त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत दानवे खासदार म्हणून विजयी झाले. या चारही निवडणुकींत दानवेंच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांनी काम केले आहे. यावेळी यात बदल झाला आहे. दानवे व खोतकर हे एकेकाळचे मित्र आज शत्रू बनले आहेत. त्यामुळे खोतकरांनी भाजप-शिवसेनेची युती झाली तरी निवडणूक लढविणारच, अशी भूमिका जाहीर केली आहे. जालना येथे झालेल्या पशुप्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकरांना इकडे तिकडे पाहू नका,  घरातील भांडण घरातच मिटवा. दोन भावांंतील एकाचे चुकले तर दुसर्‍याने समजूतदारपणाची भूमिका घ्यायची असते, असे सांगत खोतकरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपण आता फार पुढे निघून गेलो, असे सांगून खोतकरांनी निवडणूक लढविण्याचा इरादा स्पष्ट केला. खोतकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचा आरोप दानवे यांनी मध्यंतरी जाहीर कार्यक्रमात केल्याने खोतकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. 

प्रशासकीयदृष्ट्या विचार करता या मतदारसंघात जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात जालना शिवसेनेकडे तर बदनापूर, भोकरदन भाजपकडे आहेत. फुलंब्रीत भाजप, सिल्‍लोडला काँग्रेस व पैठणला शिवसेनेचा आमदार आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय हालचालींकडे सगळ्यांचेच लक्ष असते. दानवे यांनी गेल्या महिन्यातच भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक जालन्यात घेतली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात जाहीर सभाही झाली. खोतकर यांनी महाराष्ट्र केसरी, कृषी महोत्सवातून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीत यावर्षी समीकरणे बदलली आहेत. ग्रामीण भागावर खोतकर यांची असलेली पकड व दांडगा जनसंपर्क या खोतकरांच्या जमेच्या बाजू आहेत. सतत चार वेळेस निवडून आलेल्या दानवेंविरुद्ध एकीकडे विविध कारणांमुळे नाराजी असली तरी मागील तीन टर्ममधे केले नसतील एव्हढी विकासाची कामे दानवे यांनी या वेळी केली आहेत. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, आयसीटी महाविद्यालय, सीड पार्क, शहरात सिमेंट रस्ते यासारखी विविध विकास कामे दानवे यांनी केली आहेत. दानवे यांच्या विरोधात आजपर्यंत काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवार दिला होता. त्यामुळे स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाने उमेदवार लादल्याची भावना असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दानवेंना मदत करीत होते. मात्र, खोतकर यांनी निवडणूक लढविल्यास समीकरणे बदलणार आहेत. दुसरीकडे अचलपूरचे आमदार बच्चू कडू हेसुद्धा दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू यांनी निवडणूक लढविल्यास मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र दिसणार आहे. वंचित आघाडीचे माजी 

खासदार प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यात नुकतीच जाहीर सभा घेऊन शक्‍तिप्रदर्शन केले. सभेला झालेली गर्दी पाहता या पक्षाने तुल्यबळ उमेदवार उभा केल्यास व गर्दीचे रूपांतर मतदानात झाल्यास चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.