Thu, Jul 09, 2020 03:14होमपेज › Jalna › जालना : कुख्यात गुंड सोन्‍या जाधवचा जमावाकडून निर्घुण खून

कुख्यात गुंड सोन्‍या जाधवचा निर्घुण खून

Published On: Jun 10 2019 10:45AM | Last Updated: Jun 10 2019 10:45AM
जालना : प्रतिनिधी

कुख्यात गुंड तान्या उर्फ विक्की जाधव याचे कुटुंब आणि लोहार मोहल्यातील रहिवाश्यांमध्ये ६ जून २०१९  रोजीच्या रात्री तुफान वाद झाला होता. याच वादाचे रुपांतर  लोहार मोहल्ल्यात उमटले व सोन्या उर्फ रोहित जाधव (वय १७) याचा (रविवारी ता.९)  जमावाकडून निर्घुण खून करण्‍यात आला. 

काय आहे सर्व प्रकरण

कुख्यात गुंड तान्या उर्फ विक्की जाधव याचे कुटुंब आणि लोहार मोहल्यातील रहिवाश्यांमध्ये ६ जून २०१९ रोजीच्या रात्री तुफान वाद झाला होता. यावेळी रहिवाशी जमावाने आक्रमक होऊन तान्या जाधव आणि त्याच्या काही नातेवाईकांची घरे पाडली होती. यावेळी तान्याच्या पूर्ण कुटुंबाने पलायन केले होते. याप्रकरणी जमावाविरुद्ध पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेख मासुम यांच्या फिर्यादीवरून कुख्यात गुंड तान्या जाधव, सोन्या उर्फ रोहित जाधव, भुट्ट्या उर्फ आकाश जाधव या तीन सख्ख्या भावासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादानंतर लोहार मोहल्ल्यात सदर बाजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मात्र काल रविवारी (ता.९) रात्री ७.३० वाजता पडलेले घर पाहण्यासाठी येत असताना सोन्या उर्फ रोहित यास जमावाने एका नाल्यात गाठून बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर झालेल्या सोन्याचा जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अर्धा तासात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सध्या सोन्याचा मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात आहे. सोन्याच्या मारेकऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून, काही जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. सोन्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात खून, दरोडे, चोऱ्या, घरफोड्या असे गुन्हे दाखल असल्याचे समजते. यानंतर लोहार मोहल्ला परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.