Mon, Jul 06, 2020 15:06होमपेज › Jalna › डोल्हारा, बाबूलतारा येथील दुधना नदीतून अवैध वाळू उपसा

डोल्हारा, बाबूलतारा येथील दुधना नदीतून अवैध वाळू उपसा

Published On: Jan 31 2018 2:04AM | Last Updated: Jan 31 2018 12:33AMपरतूर : प्रतिनिधी 

तालुक्यातील डोल्हारा व बाबूलतारा येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे. याबाबत सरपंचांसह ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

येथील गट. नं. 450, 463, 464, 469, 470 या गटांचा लिलाव झालेला आहे. मात्र गुत्तेदार हा लिलाव झालेल्या गटातून वाळू उपसा न करता नियमबाह्य बाबूलतारा शिवारातील गट नं. 40, 41, 42, 43, 44, 45 या तर डोल्हारा शिवारातील 53, 54, 55, 56 गटांचा लिलाव झाला नसतानाही या गटातून अवैध बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. या प्रकाराकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे बाबूलतारा येथील सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केला आहे.

वाळूपट्ट्याचा लिलाव झालेल्या गटाची हद्द (खुणा) करणे तलाठी व मंडळाधिकारी यांना बंधनकारक असताना दुधना नदीपात्रात कुठेच खुणा केलेल्या नाहीत. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी या गुत्तेदारासोबत संगनमत करून अवैध वाळू उपसा करण्यासाठी दुधना पात्र खुले करून दिले आहे. वाळू उपसा करताना रॉयल्टी पावती ही एका ट्रकची तीन ब्रासची घेऊन  त्यावर प्रत्येक वेळी सात ब्रास वाळूची वाहतूक केली जाते. एकाच पावतीवर दिवसभर वाळूची ट्रकच्या साहाय्याने क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते. वाळू उपशामुळे पाणीपातळी खालावली आहे. शाळाजवळून रस्ता जात असल्याने शाळकरी मुलांना धुळीचा व आवाजाचा त्रास होत आहे. डोल्हारा व बाबूलतारा दुधना नदीपात्रात अवैध वाळू उपसा झालेल्याचे मोजमाप करून संबंधिताना महसूल विभाग व गुत्तेदार यांच्याकडून अवैध वाळू उपसा केलेल्या वाळूचे पैसे वसूल करावेत. दोषींविरुद्ध कारवाई करावी, नसता 5 फेब्रुवारीपासून तहसील कार्यालय, परतूर येथे उपोषण करण्यात येईल. निवेदनावर बाबूलतारा सरपंच सरस्वती घाटूळ, पंढरीनाथ मुळे, अनिल पंडित, राजेभाऊ काळे, सुरेश मुळे,नामदेव घाटुळे, रामराव मुळे, महादेव मुळे, अर्जुन कोळे, महादेव आतकडे, संदीप बागल, जगन काळे, विष्णू टोणपे, बालाजी काळे, नारायण देवकर, गणेश मुळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.