Thu, Jul 09, 2020 05:21होमपेज › Jalna › अवैध वाळू वाहतुकीने अपघाताची भीती

अवैध वाळू वाहतुकीने अपघाताची भीती

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:38PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातून रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक होत आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

वाळू वाहतुकीचा मोठा व्यवसाय सुरू असल्याने भर चौकातून विविध भागांमध्ये वाळू वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे वाळूची वाहतूक करणारी वाहने वेगाने जातात. अनेक ठिकाणी किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. 
टेंभुर्णी येथील शिवाजी चौकात वाळू वाहतूक करणार्‍या टिप्परची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. याकडे पोलिस प्रशासन, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पूर्णा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जेसीबीचा वापर करून जीपसह ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केली जाते. पूर्णा नदीचे पात्र उपशामुळे खड्डेमय झाले आहे. थातूरमातूर कारवाई वगळता महसूल विभागाने पोलिसांचे अभय मिळत असल्याने याबाबत नागरिकांतून नाराजी आहे. 

बहुतांश वाळू वाहतूक करणारे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांची वाळू वाहतुकीवर तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे एरवी राजकीय मंचावर एकमेकांचे विरोधक असणार्‍यांचे वाळू वाहतुकीत मात्र साटेलोटे असून याबाबत पोलिस प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे अवैध वाळू वाहतूक करण्यामध्ये पोलिस प्रशासनातील कर्मचारी मागे नसून तीन ते चार पोलिस कर्मचारी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात, यामुळे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलिसांच्या बंदोबस्तात पोहोचते केले जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. वाळूमाफियांचा पहारा रात्रभर येथील शिवाजी चौकात असतो. रात्रभर वाळू वाहतुकीच्या टिप्पर ट्रॅक्टरमुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.