Mon, Jul 06, 2020 09:09होमपेज › Jalna › भाडेकरूंच्या नोंदणीत घरमालकांची उदासीनता

भाडेकरूंच्या नोंदणीत घरमालकांची उदासीनता

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:41AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात भाडेकरूंच्या पोलिसांकडे  करावयाच्या नोंदणीबाबत घरमालकांमधे उदासिनता दिसून येत आहे. सुमारे  पाचशेच्यावर घरमालकांनीच भाडेकरूंची नोंदणी संबंधित पोलिस ठाण्यात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एटीएस विभागाच्या वतीने गतवर्षी जिल्ह्यातील 18 घरमालकांना भाडेकरूंची नोंदणी करण्यात न आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांसह ग्रामीण भागात भाडेकरूंची संख्या मोठी आहे. देशात होणार्‍या घातपाती कारवायासह इतर कारणांमुळे या कारवायांना आळा बसावा, यासाठी भाडेकरूची नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीनेही याबाबत वेळोवेळी नोंदणी करण्याबाबत आवाहन केले जाते. मात्र असे असूनही घरमालकांना या बाबींचे पुरेसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. भाडेकरू नोंदणीसाठी त्या त्या पोलिस ठाण्यात एक अर्ज भरून भाडेकरूचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्राची प्रत तसेच दोन फोटोची आवश्यक असते. ही माहिती स्थानिक पोलिसांकडे सुरक्षित ठेवण्यात येते. घरमालकांनी जास्तीत जास्त संख्येने भाडेकरूची पोलिस ठाण्यात नोद करावी यासाठी एटीएस शाखेचे पोलिस अधूनमधून तपासणी करतात. या तपासणीत नोंदणी न केलेले भाडेकरू न सापडल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो. 

वर्षभरात 18 घरमालकांवर गुन्हे 

2017- 18 या एका वर्षात एटीएस विभागाने 18 घरमालकांविरोधात भाडेकरूची माहिती न दिल्याने गुन्हे दाखल केले आहेत. भाडेकरूच्या नोंदणीबाबत घरमालकांमधे कमालीची उदासीनता दिसून येत आहे. पोलिसांमध्ये नोंदणी करावयाची म्हटल्याने भाडेकरू व घरमालकांच्या संबंधातही अविश्‍वासाचे वातावरण निर्माण होत असल्याने अनेक मालक नोंदणीसाठी टाळाटाळ करतात. या प्रकारातून मोठी घटना घडल्यानंतर काही घरमालकांना उशिराने शहाणपण सुचते. 

शहरात राहणार्‍या नोंदणीकृत असलेल्या व संशयित भासणार्‍या भाडेकरूंवर लक्ष ठेवणेही नोंदणीमुळे पोलिसांना सोइस्कर ठरते. अनेक घरमालक दर महिन्यास मिळणार्‍या भाड्याच्या पैशासमोर भाडेकरूच्या नोंदणीला दुय्यम महत्त्व देतात. त्यानंतर पोलिसांच्या तपासणीत भाडेकरूंची नोंदणी केलेली न आढळल्यास होणार्‍या कारवाईपासून घरमालकांची पळापळ झालेली अनेकदा पाहावयास मिळते.

पोलिसांच्या या कारवाईमुळे  जिल्ह्यासह परप्रांतातून आलेल्या लोकांची सविस्तर माहिती पोलिसांच्या रेकॉर्डवर येते. घरमालकांनाही याचा फायदा होतो. घरात राहणारा भाडेकरू अनोळखी असल्यास व तो एखाद्या गुन्ह्यात सापडल्यास पोलिसांना कारवाईत अडचणी येत नाहीत. यामुळे भाडेकरूंची नोंदणी आवश्यक आहे. एटीएसने वर्षभरात नोंदणी न करणार्‍या 18 घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.