Sat, Oct 31, 2020 16:40होमपेज › Jalna › घनसावंगी तालुक्यात पावसाने पूल वाहून गेला

घनसावंगी तालुक्यात पावसाने पूल वाहून गेला

Last Updated: Oct 27 2020 1:35AM
घनसावंगी : पुढारी वृत्तसेवा 

घनसावंगी तालुक्यात काल (दि.१९) शनिवार दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड गावाजवळील नरूळी नदीच्या पात्रात असलेला पुल आणि दोन्ही बाजूला असलेला भराव रात्री वाहून गेला. त्यामुळे सुमारे २२ गावांचा संपर्क तुटला आहे. 

अंबड ते पाथरी या मार्गावर असलेला पुल पूर्ण वाहून गेला आहे. यामुळे घनसावंगी, कुंभारपिंपळगाव या परिसरातील वाहतूक बंद झाली. अंबड-पाथरी गावाचा संपर्क तुटला असून यामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. नरुळा नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्यामुळे तो पूल पाडून तेथे नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले आहे.  

दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून नरुळा नदी पात्रात मातीचा भराव टाकून कच्चा पूल तयार करण्यात आला होता. शनिवारी रात्री सलग ३ तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नरुळा नदीच्या पाणीसाठ्यात अचानकच वाढ झाली. नदीचा पाणी प्रवाह गतीने असल्यामुळे मातीचा भराव टाकून बनविलेला कच्चा पूल पाण्यासोबतच वाहून गेला. गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. 

हा पुल वाहून गेल्याने कुंभार पिंपळगाव, देवीदहेगाव, पाडूळी, विरेगव्हाण तांडा, जांबसमर्थ, कोठाळा, घाणेगाव, भेंडाळा, मुर्ती, लिंबी, धामणगाव, मासेगाव, राजाटाकळी, शिवणगाव आदीसह ५० गावांचा संपर्क तुटला आहे. मुख्य मार्ग बंद झाल्याने या गावातील नागरिकांना आता तिर्थपुरी मार्गे जावे लागणार असून यामुळे ३० किलोमीटरचा प्रवास वाढणार आहे ज्यामुळे अंबड-पाथरी गावाचा संपर्क तुटला असून यामार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे.

 "