Sun, Sep 27, 2020 03:41होमपेज › Jalna › पालकमंत्र्यांनी केली बांधकामाची पाहणी 

पालकमंत्र्यांनी केली बांधकामाची पाहणी 

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:14AMजालना : प्रतिनिधी

राज्य राखीव पोलिस दलाच्या कार्यालय व  अधिकारी,  कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. कामाचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. 

यावेळ जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, भुजंगराव गोरे, विलास नाईक, विरेंद्र धोका, उद्योगपती किशोर अग्रवाल, समादेशक भारत तांगडे, विभागीय अभियंता ज्योती कुलकर्णी, कार्यकारी अभियंता  फडतरे, प्रकल्पाचे व्यवस्थापक हेमंत बेंडाळे, कंत्राटदार दर्शन बंब, पोलिस निरीक्षक बी.ए. शेख, डब्ल्यू. यू. गुडेकर, काथार आदींची उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, राज्य राखीव पोलिस दलाच्या कार्यालयाची तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली होती. जनतेसाठी अहोरात्र राबणार्‍या पोलिसांची निवासस्थाने व कार्यालय सुसज्ज असावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी 557 निवासस्थाने, सुसज्ज समादेशक कार्यालय इमारत, कंपनी कार्यालय, बिनतारी संदेश कार्यालय, वाहतूक कार्यशाळा, बहुउद्देशिय कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीबरोबरच व्यायामशाळा, वाचनालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उभारणीचे काम काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.