Fri, Jul 03, 2020 19:11होमपेज › Jalna › जाफराबाद येथील रंगपंचमीची परंपरा

जाफराबाद येथील रंगपंचमीची परंपरा

Published On: Mar 06 2018 1:18AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AMजाफराबाद : प्रतिनिधी

सतराव्या शतकापासून जाफराबाद येथे पाच दिवसांची रंगपंचमी खेळण्याची परंपरा आजही जपली जाते. रंगपंचमीच्या निमित्ताने देवीची मिरवणूक काढण्यात येते.पारंपरिक प्रथेप्रमाणे यावेळी रंगाची मुक्‍तपणे उधळण केली जाते.

निजाम राजवटीत जाफराबाद येथे इ.स.1633 पासून पाच दिवसांची रंगपंचमी खेळण्याची प्रथा सुरू झाली आहे. उत्तर हिंदुस्थानी समाजबांधवांनी ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवली . वसंत पंचमीपासून रंगपंचमीला सुरुवात होते. दांडी पौर्णिमेला फाग होळी गीतांसह सवाद्य मिरवणूक  काढली जाते. धूलिवंदनाच्या दिवशी गावात रंगमेळा भरवून तमाशा, जलशासह गुलाल मेळा खेळला जातो.

जाफराबादमधील ऐतिहासिक किल्ल्याच्या मदार दरवाजाजवळील महेबूब सुबानी दर्ग्याजवळ रंगमेळा पोहचल्यानंतर मराठी आणि उत्तर हिंदुस्थानी समाजबांधवांमध्ये रंगाची उधळण करण्यात येते. मुस्लिम बांधव देखील रंगमेळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात.रंगपंचमीच्या तिसर्‍या दिवशी रंगासाठी सवाद्य मिरवणुकीने जाऊन गावातील प्रतिष्ठित लोकांच्या अंगावर रंग टाकला जातो.त्यानंतर मानकरी यांच्या घरी पान- सुपारीचा कार्यक्रम होतो. चौथ्या दिवशी महाबुरीज मेळा घेतला जातो. या दिवशी गावातील सर्व समाजातील ज्येष्ठ लोक रंग खेळतात. रंगांची उधळन दिवसभर सुरू राहते. पंचमीच्या दिवशी देवीचे सोंग काढले जाते.

धूलिवंदनापासून ते पाचव्या दिवसांपर्यंत लव लोखंडे हे देवीच्या नावाने निरंकार  उपवास करतात.देवीच्या सोंगाप्रमाणे महिषासुराचे सोंग घेण्याची परंपरा दुबे घराण्याकडे कायम आहे. हातामध्ये ढाल मुसळ घेऊन देवीच्या समोर युध्दाचे आव्हान करण्यात येते या युध्दाला मकीरफ असे म्हणतात. देवीस पकडण्याचा मान बायस, जैस्वाल, गौतम कच्छवाह, उपाध्याय यांच्या घराण्याकडे होता तो   आजही कायम आहे. 

देवीची स्वारी भोईगल्ली, पोलिस कॉलनी, बाजार गल्ली, मदार दरवाजापासून बाजारपेठेच्या मार्गाने  येऊन दानव मारल्यानंतर देवीच्या सोंगाचा विधिवत समारोप केला  जातो.

कालिंकामातेचे सोंग अनुराधा नक्षत्रावर काढण्यात येते. या सोंगाला परदेशीचे सोंग म्हणून ग्रामीण  भागात ओळखले जाते.देवीचे सोंग घेण्याची बायस घराण्याची पंरपरा होती.परंतु नंतरच्या काळात मराठा समाजातील मानसपुत्र (गुराखी) मोहन लोखंडे यांना देवीच्या सोंगाचा मान देण्यात आला होता. त्यानंतर  रामराव लोखंडे हे त्यांचे सुपुत्र यांना देवीच्या सोंगाचा मान मिळाला.सात वर्षांपूर्वी रामराव लोखंडे यांचे निधन झाले.तेव्हापासून सोंगाचा मान  लोखंडे यांना मिळाला.