Fri, Jul 03, 2020 20:22होमपेज › Jalna › राज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा

राज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 11:42PMजालना : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून, नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सहकार क्षेत्र तळागाळापर्यंत पोहचल्यामुळे वित्तीय संस्थांचे जाळे तयार झाले आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास हा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होत आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील 32 कोटी लोकांना थेट लाभ मिळाला असून, नागरिकांच्या खात्यावर विविध योजना आणि अनुदानाच्या रक्कमा थेट जमा होत आहे. हे वित्तीय संस्थांच्या सहभागामुळेच शक्य झाले आहे. तसेच वित्तीय संस्थांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत असल्याने वित्तीय व्यवहारात पारदर्शकता आणि जनेतमध्ये वित्तीय संस्थांबाबत विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. विश्‍वस्त व्यवस्थेतून जे विधायक काम होते ते राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यास निश्‍चितच मदत करीत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी फडणवीस यांनी पतसंस्थेची पाहणी करुन संचालक मंडळाशी चर्चा करून पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे संचालक तथा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.