होमपेज › Jalna › गिरजा नदीपात्रात पंधरा फूट खड्डे

गिरजा नदीपात्रात पंधरा फूट खड्डे

Published On: Dec 11 2018 1:39AM | Last Updated: Dec 10 2018 11:53PM
भोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यातील हसनाबाद व केदारखेडा येथून वाहणार्‍या गिरजा-पूर्णा नदीच्या पात्रातून आतापर्यंत बेसुमार अवैध वाळू उपसा झाल्याचे  समोर आले आहे. सध्या गिरजा नदीपात्रात दोन दोन परस म्हणजे 14 ते 15 फूट खोल मोठमोठे खड्डे पडल्याने हे पात्र तस्करांनी अक्षरशःओरबडल्याचे दिसत आहे. 

आतापर्यंत या अवैधरीत्या झालेल्या अवैध वाळू उपशाला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. महसूल आणि पोलिस प्रशासन कुठे आहेत असे देखील विचारले जात आहे. गिरजा नदी पात्रातील वाळूचा अवैध उपसा थांबविण्यासाठी झालेल्या उपोषणानंतर आता तेथील वाळू तस्करी बंद आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नदीच्या पात्राचे रुप बदलून गेले आहे. शासनाच्या करोडो रुपये किमतीची नैसर्गिक संपत्ती चोरली जात आहे. संबंधित अधिकार्‍यांनी त्याच वेळी लक्ष दिले असते तर आज घडीला नदी पात्राचे झालेले हाल थांबले असते. 

हसनाबाद व  केदारखेडा परिसरातील गावच्या वाळूमाफियानी गिरजा-पुर्णा नदीच्या पात्रात अक्षरशा हैदोस घातल्याचे समोर आहे. केदारखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षापुर्वी बांधलेल्या नवीन पुलाखालील देखील अवैध वाळू उपास क रताना तस्करांनी चक्‍क पुलाखालीच मोठे मोठे खड्डे केले आहेत. काही दिवसांनी हा पूल देखील धोकादायक होण्याची शक्यता आहे. सध्या तर खड्ड्यांमुळे नवीन पुलाला धोका निर्माण झाला आहे. 

महसूल विभागाचे पथक नावालाच

शासनाचा महसूल बुडवून अवैध गौण खनिजाची चोरी करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. भोकरदन तालुक्यात अनेक दिवसांपासून वाळूची अवैधरीत्या चोरटी वाहतूक सुरू आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नसल्याने महसूल विभागाची पथके नावालाच आहेत की काय असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
चौकशीचे आदेश दिले आहेत : गवळी 

दरम्यान गिरजा नदीपात्रात खडकी येथील नानासाहेब वानखेडे यांनी पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ अवैध वाळू तस्करी होत असल्याने गिरजा नदी पात्रातील तस्करी थांबविण्यासाठी चक्‍क विहिरीत उपोषण सुरू केले होते. या नंतर भोकरदनचे तहसीलदारांना या उपोषणा संदर्भात तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
-हरिश्‍चंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी, भोकरदन