Mon, Jul 06, 2020 15:34होमपेज › Jalna › रेशीम शेतीतून शेतकर्‍यांची अर्थक्रांती

रेशीम शेतीतून शेतकर्‍यांची अर्थक्रांती

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:23PMघनसावंगी : प्रतिनिधी

तालुक्यात 263 शेतकर्‍यांनी 251 एकर क्षेत्र तुतीची लागवड केली आहे. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण, अनुदान यांच्या आधारे शेतकरी चांगल्या दर्जाचे रेशीमकोष तयार करू लागला आहे. वर्षाला सुमारे तीन ते चार बॅचेस व प्रति बॅच सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न गृहित धरले तरी या शेतीतून त्याचे अर्थकारण सक्षम व शाश्वत होत आहे.ऊस, कापूस, तूर, सोयाबीन, फळबागा यांसाठी प्रसिद्ध असलेल्या घनसावंगी तालुक्याला कधी दुष्काळ, कधी बोंडआळी, गारपीट, गडगडलेले शेतीमालाचे दर, वाढती मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. अशावेळी इथल्या शेतकर्‍यांना रेशीम शेतीने चांगला हात व साथ दिली आहे. आगामी  काळात घनसावंगी तालुका रेशीम शेतीत अग्रेसर म्हणून ओळखला जाणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि हमीभावाचा न सुटणारा तिढा यामुळे दिवसेंदिवस शेती करणे अवघड बनत चालले आहे. 

तालुक्यातील शेतकर्‍यांनी निसर्गाच्या परिणामाला फाटा देत, हुकमी भाव देणार्‍या रेशीम शेतीची कास धरली आहे. काही गावांनी तर  या उद्योगात लक्षणीय आघाडीही घेतली आहे.
खर्च कमीबेभरवशाचे हवामान व शेतमालाचे दर या पेक्षा रेशीम शेती शेतकर्‍यांना शाश्वत वाटते.  कुशल  व्यवस्थापन, हवामान व अनुकूल दर मिळाल्यास प्रति बॅच अगदी पन्नास हजारांच्या आसपास  उत्पन्न देण्याची क्षमता या उद्योगात आहे. तुतीची एकदा लागवड केली की पंधरा वर्षांपर्यंत टिकते. 

पुनर्लागवडीचा खर्च कमी असून किडींचा फार मोठा अ‍ॅटक नसल्याने फवारणींची गरज नाही. खर्च कमी, झाड वर्षाचे झाले व उन्हाळ्यात दोन- अडीच महिने पाणी अल्प मिळाले तरी ते तरते. त्यानंतर पुन्हा पाऊस पडल्यास उभारी घेते. पाल्याचा पुरवठा कीटकांसाठी सुरू राहतो. उत्पादन खर्चाच्या तुलनेत रेशीम कोषांना दर चांगले. त्यामुळे नफा वाढतो. रेशीम तंत्रज्ञान, प्रशिक्षण व अंडीपूंज यांची सहज उपलब्धता अळ्यांनी खाऊन उरलेला पाला, फांद्या जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आणता येतो. 


रेशीम अळीचे अंडीपुंजातून बाहेर आल्यानंतर, पाच अवस्थेपासून संक्रमण होते. अळीचे  साधारणत: 25 ते 26 दिवसांनंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी होते.  तोंडावाटे सिल्क धागा सोडण्यास सुरुवात करते. या अळया कोष निर्मितीकरिता प्लास्टिकच्या चंद्रिकेवर सोडण्यात येतात. रेषीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते आणि कोष बनविण्याची प्रक्रिया 4 ते 5 दिवसांत पूर्ण होते. कोषावर आलेली अळी जवळपास  1000 ते 1200 मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टिक चंद्रिकेवर 400 ते 500 कोष तयार होऊ शकतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 2.5 ग्रॅम असते. 

Tags : Jalna, Farmers, revolution, silk, farming