Fri, Jul 03, 2020 18:03होमपेज › Jalna › शेतकर्‍यांचा हरभरा मोजणीविना पडून

शेतकर्‍यांचा हरभरा मोजणीविना पडून

Published On: Jun 01 2018 1:59AM | Last Updated: May 31 2018 11:32PMजालना : प्रतिनिधी

शासनाच्या हरभरा खरेदी प्रक्रियेची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या 4  हजार 952 शेतकर्‍यांपैकी केवळ 1 हजार 401 शेतकर्‍यांच्या हरभर्‍याची खरेदी झालेली आहे. शासकीय यंत्रणांचा बेताल कारभार व त्यांचे खासगी यंत्रणेशी असलेले साटेलोटे यामुळे खीळ बसली असून, हजारो शेतकर्‍यांचा हरभरा मोजणीविना पडून आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर हरभरा खरेदी केंद्रावर 9 एप्रिलपासून खरेदी सुरू करण्यात आली आहे. प्रारंभापासून हरभरा खरेदीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तूर खरेदीमुळे वखार महामंडळाचे गोडाऊन फुल्ल झाले आहे. परिणामी हरभरा साठविण्यासाठी जागा शिल्लक नाही. तसेच बारदानाही संपला आहे. यामुळे नाफेडच्या वतीने 12 मेपासून हरभरा खरेदी आठ दिवस बंद करण्यात आली  होती.

परतूर व अंबड येथे तूर खरेदी संपल्याने तेथे हरभरा खरेदी सुरू होती. व्यापारी 3 हजार ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने हरभरा खरेदी करीत असतानाच नाफेडमधे 4 हजार 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी नाफेडकडे मोठी गर्दी करीत होते, मात्र विविध कारणांमुळे नाफेडचे केंद्र बंद चालूच्या फेर्‍यात अडकल्याने शेतकर्‍यांना मनस्ताप सोसावा लागला.शेतकर्‍यांच्या हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसह विविध अटी घालण्यात आल्यानंतरही शेतकर्‍यांनी भाव चांगला मिळत असल्याने गर्दी केली,

मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभरा पडलेला आहे. चारही खरेदी केंद्रात 4 हजार 952 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांपैकी 1 हजार 401 शेतकर्‍यांकडून 29 मेपयर्र्ंत 16 हजार 518 क्विंटलची खरेदी करण्यात आली आहे. अजूनही नोंदणी केलेल्या 3551 शेतकरी प्रतीक्षेत आहे. नाफेडच्या हलगर्जीपणामुळे खरेदी केंद्र कित्येक दिवस बंद होते. यामुळे शेतकर्‍यांतून असंतोष व्यक्‍त होत असून खरेदी सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.