Mon, Jul 06, 2020 07:40होमपेज › Jalna › पीकविमा योजनेच्या जोखमीची व्याप्ती वाढवली

पीकविमा योजनेच्या जोखमीची व्याप्ती वाढवली

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 1:40AMजालना : प्रतिनिधी

2016 पासून राज्यात खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कापूस,  बाजरी,  सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, मूग, तूर, उडीद, मका व कांदा या पिकांचा विमा योजनेत समाविष्ट केलेला आहे. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी सरकारने या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढवली आहे. आता या योजनेतील जोखमीची व्याप्ती 70 टक्के करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत आहे. 

योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित केला आहे. पिकाचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील 7 वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते. या योजनेंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढलेली आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे, सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात, अशा शेतकर्‍यांना योजना बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकर्‍यांना योजना ऐच्छिक राहील. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी गावपातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता राज्यात  कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाने नियोजन केले आहे.