Mon, Jul 06, 2020 14:47होमपेज › Jalna › शहरात दररोज ४० हजार लिटर दूध

शहरात दररोज ४० हजार लिटर दूध

Published On: Feb 06 2018 1:45AM | Last Updated: Feb 05 2018 10:48PMजालना : प्रतिनिधी

शहरात दररोज विविध कंपन्यांच्या पिशवीतील दुधांसह खासगी विक्रेत्यांचे मिळून 40 हजार लिटर दूध विक्री केले जाते. दुधाच्या दर्जाबाबत मात्र साशंकता आहे. अन्‍न औषधी व भेसळ विभागाकडून अधूनमधून दुधाची तपासणी केली जाते, मात्र दुग्ध व्यवसायाच्या या महासागरात तपासणीलाही निरनिराळ्या कारणांमुळे मर्यादा पडत असल्याचे दिसत आहे. 

दररोज 20 हजार लिटर विविध दूध उत्पादक खासगी कंपन्यांचे तर शेतकर्‍यांसह खासगी दूध विक्रेत्यांचे लूजमध्ये 20 हजार लिटर असे 40 हजार लिटर दूध विकले जाते. कंपन्यांचे जवळपास 20 हजार लिटर तर खासगी दूध विक्रेत्यांचेही किरकोळ जवळपास 20 हजार लिटर दूध विक्री होते. खासगी  दुधाची किरकोळ विक्री करणारे काही विक्रेते दुधाच्या पिशव्या कॅनमधे टाकून त्यात पाणी मिसळून दुधाची विक्री करतात, तर काही दूध उत्पादकांनी दूध पावडर दूध व पाण्यात मिसळून आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली आहे. या धंद्यात अनेक जण मलई चाखत असतानाच मुले व नागरिक पित असलेले दूध कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्‍न खरा प्रश्‍न आहे.

याबाबत अन्‍न व भेसळ विभागाच्या अधिकार्‍यांच्या बोलण्यातून दुधाबाबत ऑल इज वेल असल्याचे ऐकावयास मिळाले. शुद्ध दूध विकताना ग्राहक तेवढे पैसे देण्यास तयार होत नसल्याने दुधात पाणी टाकून कमी भावात किरकोळमध्ये दूध विकावे लागते, असे विक्रेते भेसळचे समर्थन करताना खासगीत सांगतात. 

दुधाचे दोन नमुने अप्रमाणित

16 ते 22 जानेवारी दरम्यान, अन्‍न, औषधी प्रशासनाच्या वतीने दुधाचे 14 नमुने घेण्यात आले. ते लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी घेण्यात आलेल्या दोन नमुन्यांत मधुर गोल्ड व एक लूज दूध अप्रमाणित असल्याचे आढळून आले. दरम्यान अप्रमाणित असले तरी या दोन्ही नमुन्यांत आरोग्यास हानीकारक असे काही नसल्याचे निष्पन्‍न झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्पादन, एक्स्पायरी तारखेला बगल

दुसरीकडे अनेक कंपन्यांच्या पिशवीबंद दुधावर पॅकिंगची तारीख नसल्याचे समोर आले. हे दूध कधी पॅक केले यासह दुधातील दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिलेले आहे. अन्‍नभेसळ विभागाकडे शहरात मोठ्या प्रमाणावर येणार्‍या दुधाची तपासणी करण्यासाठी कर्मचारी यंत्रणा अपुरी असल्याने ते दूध तपासणीत कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.