Mon, Jul 06, 2020 08:54होमपेज › Jalna › आठ कोटींच्या वसुलीसाठी महावितरणने कंबर कसली

आठ कोटींच्या वसुलीसाठी महावितरणने कंबर कसली

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:08AMजालना : प्रतिनिधी

शहरात वीज वितरण कंपनीने आठ कोटींच्या वसुलीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. फेब्रुवारीअखेर 4 कोटी 43 लाख रुपयांच्या थकबाकीचे उद्दिष्ट असताना महावितरणच्या अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता शोभा पिंलगवाड व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी 4 कोटी 70 लाखांची वसुली केली. दरम्यान थकीत वीजबिलासाठी तहसील व पोलिस अधीक्षक कार्यालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत. 

जालना शहरात जवळपास 40 टक्के वीज गळती असून, थकीत वीजबिलाचे प्रमाणही मोठे आहे. या पार्श्‍वभूमीवर महावितरणने शहरात वीजबिल वसुली मोहीम गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे सुरू केली आहे. त्यासाठी सहा हजार रुपयांवर थकबाकी असलेल्या घरगुती ग्राहकांना सुरुवातीस त्या -त्या भागातील लाइनमनद्वारे  बिल भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वीजबिल न भरणार्‍या जवळपास अडीच हजार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच मार्च एडिंगचे कारण पुढे करून सुरू झालेल्या वीजबिल वसुली मोहिमेमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. शहरात 8 कोटी रुपयांची थकबाकी असून वीजबिल वसुलीसाठी शासकीय निमशासकीय कार्यालयांसह लोकप्रतिनिधींना बिल भरण्याबाबत नेाटीस देण्यात आल्या आहेत. वीजबिल कमी वसुली झालेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता असल्याने कर्मचारीही धास्तावले आहेत.  
शहरातील वसुलीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत 4 कोटी 43 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, मात्र कर्मचार्‍यांनी वसुली मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवून 4 कोटी 70 लाखांची वसुली केली आहे. 
मार्चपर्यंत दिलेले उद्दिष्ट  पूर्ण करण्याचा विश्‍वास अधिकारी व्यक्‍त करीत आहेत. दरम्यान, अनेक ग्राहकांना मागील काही दिवसांपासून वाढीव बिले येत असल्याने ग्राहक महावितरणच्या कारभाराला 
वैतागले आहेत. 

एकीकडे वसुलीचा ससेमिरा सुरू असतानाच दुसरीकडे वाढीव बिलाच्या तापाने ग्राहकांची झोप उडाली आहे.  जालना तहसील कार्यालयाकडे 7 लाख तर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे 5 लाखांची थकीत वीजबिल बाकी आहे. थकबाकी तशीच ठेवून हे कार्यालये चालूबाकी भरत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत वीजबिल न भरल्यास या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो. शहरातील चार नगरसेवकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून बिल न भरणार्‍यांवर कारवाईचा सिलसिला यापुढेही सुरूच राहणार आहे.


जालना शहरात थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरू आहे. ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरून सहकार्य करावे.
    -शोभा पिंलगवाड, 
    अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता