Thu, Jul 09, 2020 03:16होमपेज › Jalna › दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे दुग्धाभिषेक आंदोलन 

दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे दुग्धाभिषेक आंदोलन 

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 11:02PMजाफराबाद : प्रतिनिधी

दुधापेक्षाही पाणी अधिकदराने विकले जात असल्याने संतप्‍त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी आगळेवेगळे आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकर्‍याच्या अंगावर दूध ओतून दुग्धाभिषेक करून शासनाचा निषेध केला. 

शेतकर्‍यांचा आवाज शासन दरबारी पोचविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकर्‍यांना  सोबत घेऊन दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने दुधाला योग्य भाव व खाजगी दूध संघांवर योग्य कार्यवाही करावी, असे निवेदन देण्यात आले. पाण्याची बाटली दुधाच्या भावापेक्षा जास्त दरात विक्री होत असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. अत्यल्प भावामुळे दूध उत्पादकांना दुग्ध व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे. खाजगी दूध संघावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सरकारचे दूध धोरण शेतकरी विरोधी असल्याचे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

दूध भुकटीवर मिळणार्‍या अनुदानाचा दूध उत्पादकाला कोणताही फायदा होत नसल्यामुळे दूध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना आता कर्जबाजारी व्हावे लागत आहे. गायीच्या दुधाला प्रतिलीटर 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोर्ड, निवृत्ती शैवाळे, तालुकाध्यक्ष योगेश पायघन, प्रेमसिंग धनावत, भगतसिंग लोदवाल, कैलास राऊत, प्रेमसिंग रेकनोत, भागवत खंदाड यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.