Thu, Jul 09, 2020 03:02होमपेज › Jalna › ड्रायव्हिंग स्कूल परवान्यांची होणार तपासणी

ड्रायव्हिंग स्कूल परवान्यांची होणार तपासणी

Published On: Mar 14 2018 1:14AM | Last Updated: Mar 20 2018 1:48AMजालना : प्रतिनिधी 

शहरातील खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडून मोटार वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ड्रायव्हिंग स्कूलच्या परवान्याची तपासणी करण्याचे पत्र काढले आहे. यामुळे लवकरच ड्रायव्हिंग स्कूलच्या परवान्याची तपासणी होणार आहे.  

खासगी मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांकडून मोटार वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. विशेषतः प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध न करणे, दृक्श्राव्य लघुपटाची माहिती न दाखविणे, नागरिकांना रस्ता सुरक्षा, वाहतुकीच्या नियमाबद्दल प्रशिक्षण देण्यात येत नाही. या संदर्भात दैनिक पुढारीने 4 मार्चच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस.एम. शेख यांनी ड्रायव्हिंग स्कूलच्या परवान्याची तपासणीचे पत्र काढले आहे. यामुळे लवकरच शहरासह जिल्ह्यातील बोगास व परवान्याची तपासणी करण्यात येणार आहे.

 संस्थेची नोंदणी बंधनकारक
मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग स्कूलद्वारे नागरिकांना वाहन चालविण्याचे धडे देणार्‍या प्रत्येक संस्थेची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदारांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याआधी त्याला वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा अर्थ समाजवून सांगणे गरजेचे आहे.  त्यासाठी प्रशिक्षण संस्थेचे नियमांचे तक्ते, चित्रफीत मार्गदर्शक पुस्तिका, रस्त्यावरील सिग्नलची संपूर्ण माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. तसेच दोन कंट्रोल असलेल्या नवीन वाहनांतून नागरिकांना प्रशिक्षित मार्गदर्शकाद्वारे वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी संस्था बांधील आहे.  बहुतांश ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून वाहतुकीच्या नियमांसह मोटार वाहन कायद्याचे पालन केले जात नाही. ड्रायव्हिंग स्कूलच्या परवान्याच्या तपासणीमुळे ड्रायव्हिंग स्कूल सुधारतील व शिकाऊ उमेदवारास योग्य प्रशिक्षण मिळेल.