Thu, Jul 09, 2020 04:06होमपेज › Jalna › बुलेट ट्रेन नको, आधी रस्ते द्या!

बुलेट ट्रेन नको, आधी रस्ते द्या!

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 23 2018 12:01AMजामखेड ः प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील जामखेड  येथील रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहे. खराब रस्त्यामुळे  वाहन चालवणे तर दूरच, परंतु पायी चालणेही अवघड झाले आहे. देशाला बुलेट ट्रेन नाही तर रस्त्याची गरज असल्याचा सूर ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. 

जामखेड हे पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील बसस्थानक ते संभाजी चौक या रस्त्याची अवस्था चिखल व पाण्यामुळे अत्यंत वाईट झाली आहे.  गावामध्ये एकूण सहा वॉर्ड असून सतरा सदस्यीय ग्रामपंचायत आहे. रस्ते व इतर विकासकामांसाठी लाखो रुपये खर्च होत असतानाच रस्त्याचीं अवस्था वाईट झाली आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत असल्याने डासांची संख्या वाढून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची  शक्यता आहे.  

संभाजी चौकापासून थोड्याच अंतरावर दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर साचलेल्या  चिखलातून वाट काढत विद्याथ्यार्र्ंना शाळेत पोहचावे लागत आहे.  गावकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन खडकेश्‍वर महादेव मंदिराकडे जाणार्‍या भाविकांना चिखलातून जावे लागते. शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे पोलिस चौकीच्या आवारातील नालीमध्ये मुरूम टाकून पर्यायी व्यवस्था  करण्यात आली. ग्रामसभेमध्ये भूमिगत गटाराचा ठराव अनेकदा घेतला, पण प्रत्यक्षात कुठलीच कामे झाली नाही. ठराव फक्त कागदावरच राहिला. ग्रामपंचायतीने वेळीच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.