Thu, Jul 09, 2020 03:55होमपेज › Jalna › तर उद्योगपती पायाशी लोळण घेतील : प्रकाश आंबेडकर 

तर उद्योगपती पायाशी लोळण घेतील : प्रकाश आंबेडकर 

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 19 2018 11:27PMजालना : प्रतिनिधी

वंचित घटक एकत्र आल्यास देशातील टाटा-बिर्ला त्यांच्या पायाशी लोळण घेतील.निवडणुकीत जातीची लोकसंख्या कमी असल्यास त्या उमेदवाराचे तिकीट कापले जात आहे. ही लोकशाहीतील पध्दत चुकीची आहे, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडी ओबीसी भटके, विमुक्‍त, आदिवासी समुहातील सामाजिक व राजकीय प्रतिनिधी सोबत आयोजित संवाद  यात्रेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, विजय मोरे, अमित भुईगळ, दीपक डोके, जुबेर मौलाना आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होेती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्र्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुुरुवात करण्यात आली. यावेळी नाभिक, मुस्लिम, धनगर, समाजांसह इतर समाजातील प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

यावेळी अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, समाजातील वंचित समाजाने आजपर्यंत मागण्याची भूमिका बजावली. आता मागणारे न होता सत्तेत सहभागी होऊन देणारे बना. या संवाद यात्रेद्वारे समाजातील वंचितांना एकत्र करून सत्तेपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे. 

समानतेची संकल्पा डोळ्यांसमोर ठेवा

निवडणुकीत महात्मा गांधी वाटून प्रस्थापित वंचितांना सत्तेपासून दूर ठेवतात, मात्र येणार्‍या बदलासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी सर्व समाजात सुसंवाद हवा. समानतेची संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून मानवतेची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे यांची  भाषणे झाली. वंचित बहुजन आघाडीसाठी मोरे यांनी शपथ दिली. आरएसएस नव्हे तर या देशातील अठरापगड जातींचे लोक हे धर्माचे ठेकेदार बनले पाहिजे. सत्ता हीच सर्व प्रश्‍नाची गुरुकिल्‍ली असल्याने सत्तेतील प्रस्थापितांना बाजूला सारून वंचित बहुजन यांच्या हातात सत्ता येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

आरएसएस हा देशात मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. ते संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. संविधान बांधीलकी नसणारा आपला नाही हे लक्षात घ्या. मनुवादी उतरंडीच्या व्यवस्थेऐवजी समतावादी व मानवतावादी व्यवस्था देशात आणणे गरजेचे आहे. अठरापगड जातींतील लोक धर्माचे ठेकेदार बनले पाहिजे. मुस्लिमांना देशात बुजगावणे बनवून आरएसएसवाले मुस्लिमांच्या दाढीला हात घालत आपली शेंडी शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.