Fri, Jul 03, 2020 19:40होमपेज › Jalna › शेळ्या, मेंढ्यांसह धनगर समाजाचा मोर्चा

शेळ्या, मेंढ्यांसह धनगर समाजाचा मोर्चा

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 1:49AMजालना : प्रतिनिधी  

धनगर समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्याकरिता मंगळवार, 7 रोजी वडीगोद्री व जाफराबाद येथे रास्ता रोको, बदनापूर येथे शेळ्या-मेंढ्यांसह धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सकल धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. जिल्ह्यात धनगर आरक्षणासाठीसमाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे सकल धनगर बांधवांच्या वतीने दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर  जाफराबाद येथे चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

धनगर आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मंत्री महादेव जानकर यांचा फोटो लावून मंगळवार, 7 रोजी तिरडी यात्रा  काढण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद -सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी  रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.

वडीगोद्री येथील हनुमान मंदिरापासून दुुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची  तिरडी यात्रा काढून भाजप व जानकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रास्ता रोकोदरम्यान धनगर समाजातील प्रमुखांनी भाषणे केली. यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तत्काळ लागू कराव्यात, पैठण तालुक्यातील बालानगर येथील आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या  परमेश्‍वर घोंगडे  धनगर तरुणाला शहीद म्हणून घोषित करावे तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देण्यात यावी, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, मेंढ्यांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे, शेळ्या-मेंढ्याची निर्यात करणे, राष्ट्रीय शेफर्ड कमिशन नेमण्यात यावे, अंबडसह धनगर आरक्षणासाठी मागणी करणार्‍या निरपराध लोकांवरील गुन्हे परत घ्यावेत, शिरपूर प्रकरणात धनगर बांधवांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करावेत या  मागण्या करण्यात आल्या. रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार दत्ता भारस्करांना निवेदन देण्यात आले.