Mon, Jul 06, 2020 07:26होमपेज › Jalna › पाणीटंचाई आराखड्यात निम्म्याने घट 

पाणीटंचाई आराखड्यात निम्म्याने घट 

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:27AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात परतीचा पाऊस व जलयुक्त शिवारच्या कामामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाणीटंचांई आराखड्यात निम्म्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. गत वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत 48 कोटी 29 लाख 8 हजारांचा तर या वर्षी याच कालावधीत 22 कोटी 48 लाख 4 हजारांचा टंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात 2017 मध्ये जून महिन्यात अनेक तालुक्यांत पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. भर पावसळ्यात जालना, मंठा, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यानंतर जुलै महिन्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झला. पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला. मात्र त्यानंतर जिल्ह्यात भोकरदन व जाफराबाद हे दोन तालुके वगळता परतीचा पाऊस सर्वदूर झाला. उशिराने परंतु समाधानकारक झालेल्या परतीच्या पावसाने पाणीटंचाई कमी केली. त्यातच महाजन ट्रस्टसह नाम फाउंडेशनसह शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने नालाखोलीकरण व सरळीकरणाची कामे मोठ्या संख्येने करण्यात आल्याने जमिनीखालील पाणी पातळीत एक ते दीड मीटर वाढ झाली. त्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होऊन उन्हाळ्यातही कोरड्या पडणार्‍या विहिरी व बोअरवेलला चांगले पाणी राहू लागले. त्याचा परिणाम पाणीटंचाई कमी होण्यात झाला. गतवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी प्रशासनाच्या वतीने 48 कोटी 29 लाख 8 हजारांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. या वर्षी त्यात घट होऊन तो 22 कोटी 48 लाख 4 हजार रुपयांचा सादर करण्यात आला आहे.